पुणे | आता संसार सावरायला सुरुवात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुठा नदीतून गुरुवारी पहाटे अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, विठठलवाडी, तसेच निंबजनगरमध्ये आलेला पूर पूर्णत: ओसरला असून, मदतकार्याला सुरुवात झाली आहे. या पुरात तब्बल २०० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले असून, पहिल्याच दिवशी या भागातील घरे, तसेच पुरात वाहून आलेला तब्बल ११० टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला आहे.
या कचऱ्यात प्रामुख्याने गृहपयोगी साहित्य, दुकानांमध्ये पाणी घुसल्याने खराब झालेले साहित्य, पुरात वाहून आलेल्या कचऱ्याचा समावेश आहे. पूर ओसरल्यानंतर महापालिकेकडून तातडीने या भागात घरांमधील, तसेच सोसाट्यांमधील गाळ काढण्यासाठी पथके नेमली असून, यासाठी सुमारे १५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
याशिवाय सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, त्यासाठी सात जेटिंग मशिन, ३ पाण्याचे टँकर, वीजपुरवठा खंडीत असल्याने २ जनरेटर, तसेच लाइटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वछतेसाठी २०० कर्मचाऱ्यांची फौज
पुरामुळे या परिसरातील सुमारे २० हून अधिक मोठ्या सोसायट्या बाधित झाल्या आहेत. त्यात सुमारे १२० हून अधिक घरांमध्ये पाणी घुसले, तर जवळपास पाचशे ते सातशे दुचाकी वाहने अचानक आलेल्या पाण्यात बुडून बंद अवस्थेत आहेत, तर दोन टेम्पो आणि २० हून अधिक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे महापालिकेकडून शुक्रवारी सकाळी पूर ओसरताच मदतकार्याला सुरुवात झाली. ज्या इमारतीमधील तळमजल्यावरील घरात पाणी घुसले होते, त्यांचे साहित्य बाहेर काढणे, घरातील गाळ काढणे, घर धुवून देणे ही कामे केली जात आहेत. याशिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने सोसायट्यांच्या पार्किंगमधील गाळ काढला जात असून, त्यासाठी जेटिंग मशिन वापरण्यात येत आहे.
नागरिकांचा बाहेर पडण्यास नकार
या भागात पूरस्थिती उद्भवल्यानंतर महापालिकेने नागरिकांना घरात न थांबण्याचे आवाहन केले होते. मात्र, नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. त्यामुळे महापालिकेकडून या भागातील घरांमध्ये पाण्याचे कॅन, नागरिकांना जेवण, मेणबत्ती, तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहचताच नागारिकांची मोठी झुंबड उडाली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला, तसेच आमच्या भागात आधी स्वछता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर पालिकेने पथके तयार करून स्वच्छता मोहीम सुरू केली.
आम्हालाही मदत करा
महापालिकेकडून एकतानगरी भागात स्वच्छता मोहीम, तसेच मदत सुरू केल्यानंतर निंबजनगर, तसेच विठ्ठलवाडीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. केवळ याच भागात महापालिका मदत करत आहे. उर्वरीत भागात स्वच्छता, तसेच जीवनावश्यक साहित्यासाठी कोणीच मदत करत नसल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली.




