आता बचतगटही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

मुंबई – करोना संकटकाळात बचतगटांही मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले. पण आता बचतगटांची उत्पादने ही ऍमेझॉन आणि जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या उपक्रमाचा प्रारंभ आज मंत्रालयात मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, आर. विमला, दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. सध्या ऍमेझॉनवर 33, तर जीईएम पोर्टलवर 50 उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
प्रायोगिक तत्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होते. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता 33 उत्कृष्ठ उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ऍमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचे पापड, पेपर बॅग, टेराकोटा ज्वेलरी, सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले, रेशमी ज्वेलरी, शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क यांचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत 4.62 लाख बचतगट स्थापन
राज्यात आजपर्यंत 4.62 लक्ष स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये 46.70 लक्ष ग्रामीण कुटूंबांचा समावेश आहे. 19 हजार 606 ग्रामसंघ, 795 प्रभाग संघ, 8 हजार 405 उत्पादक गट तर 15 उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी व बिगर कृषी क्षेत्रात 14.48 लक्ष कुटुंबानी आपल्या उपजीविकेचे किमान 2 पेक्षा जास्त स्त्रोत विकसीत केले आहेत. माहे मे 2020 पासून एकूण रुपये 2 लाख 07 हजार 450 इतक्या रकमेची विक्री झालेली आहे. अशाप्रकारे राज्यातील बचतगटांची उत्पादने ऍमेझॉनमार्फत सध्या देशभर उपलब्ध असून लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतील.





