Nagar | आता ‘ब्लॅक स्पॉट’वर आरटीओंचा वॉच

नगर, (प्रतिनिधी) – रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आरटीओ जिल्हाभरात रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’वर वॉच ठेवणार आहेत. आरटीओंचे भरारी पथक प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळ्या ब्लॅक स्पॉटवर दिवसभर तैनात राहणार आहे. वेग मर्यादा आणि हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
जिल्ह्यातील पुणे महामार्गवरील कामरगाव घाट, सुपा घाट, वाडेगव्हाण, तर मनमाड महामार्गवरील विळद घाट, शिंगवे नाईक, नांदगाव, तर कल्याण राष्ट्रीय महामार्गवरील टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, तसेच सोलापूर महामार्गवर रूईछत्तीशी, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, पाटेवाडी तर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी, इमामपूर घाट, खोसपुरी हे अपघाताचे प्रमुख ब्लॅक स्पॉट आहेत.
अपघातात होणारे मृत्यू आणि अपंगत्व या दोन्ही गंभीर बाबी आहेत. ज्या रस्त्यावर वर्षभरात ५०० मीटर अंतराच्या आतमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला आहे, अशा स्थळांना ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. या ब्लॅक स्पॉटवर आरटीओंचे भरारी पथक तैनात राहणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी जिल्ह्यातील अपघात रोखण्यास प्राधान्य दिले आहे.
अहमदनगर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाकडे पूर्वी दोन वाहने होती. या वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात होती. परिवहन विभागाने आता आणखी ५ वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
अहमदनगर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव हे सात तालुके येतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
अपघातात सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. त्याचे मुख्य कारण डोक्यास गंभीर दुखापत हे आहे. हेल्मेट वापरल्यास मृत्यूचे प्रमाण निम्म्याने कमी करता येईल. त्यामुळेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मत कारवाई केली जाणार आहे.
भरारी पथके स्थापन केल्यानंतर वाहनचालक वाहनाचा वेग कमी करतात. त्यामुळे अपघात नियंत्रणात येत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समिती तसेच परिवहन आयुक्तांना अहवाल प्रत्येक महिन्याला पाठविला जात आहे.
वरिष्ठ पातळीवरील उपाययोजनानुसार अपघात टाळण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. – विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगर
नगर- पुणे महामार्गावर सर्वाधिक ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यावर तत्काळ उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. तसेच महामार्गावरील अनाधितृत गतिरोधक टाकले जात आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. भरतकुमार बाविस्कर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर




