पुणे -महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश झाल्याने क्षेत्रफळानुसार पुणे ही राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरत आहे. नवीन गावांमुळे पालिकेचे क्षेत्रफळ तब्बल 518.77 चौरस किलोमीटर होत आहे. त्यामुळे पुणे हे आता “महापुणे’ होणार आहे. राज्य शासनाने 29 मे 2014 रोजी 34 गावे महापालिका समाविष्ट करण्याची अधिसूचना काढत इरादा जाहीर केला होता. त्यानंतर ही अधिसूचना रद्द करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाचा आदेशानुसार 4 ऑक्टोबर 2017 रोजी 11 गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. त्यावेळी शासनाने पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने उर्वरित गावे समाविष्ट करण्यात येणार आहेत, असे न्यायालयात स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर आता थेट शासनाने 23 गावे घेण्याचा आदेश काढला. सन 2014 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांची लोकसंख्या 1 लाख 98 हजार असल्याचा अहवाल दिला होता. पण, प्रचंड वेगाने झालेल्या नागरिकरणामुळे या गावांतील प्रत्यक्ष लोकसंख्या सुमारे 7 लाखांच्या आसपास आहे. “डीपी’चे अधिकार पालिकेला ही गावे “पीएमआरडीए’ हद्दीतील होती. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण, आता नियोजन प्राधिकरण म्हणून या गावांचा विकास आराखडा करण्याचे अधिकार महापालिकेला प्राप्त झाले आहेत. विकास आराखड्याचे प्रारूप जाहीर करण्यास अद्याप राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. राज्य सरकारकडून विकास आराखड्यास मान्यता दिल्यानंतरच गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली जातील, अशी चर्चा होती. मात्र, हा निर्णय अपेक्षेच्या अगोदर घेतला गेला आहे.