आता इंटरनेटशिवाय गुगल मॅपवर लोकेशन शेअर करता येणार; नवं फीचर असणार खास

Google Maps New Feature| आज काल प्रवास करताना अनेक जण गुगल मॅपचा वापर करतात. कधी कधी मार्ग चुकला तर गुगल मॅप खूप प्रभावी ठरतो. यातच आता गुगल मॅपमध्ये एक दमदार फीचर सादर करणार आहे. जे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामध्ये यूजर्स वाय-फाय आणि सेल्युलर नेटवर्कशिवायही लोकेशन शेअर करू शकतील. अनेकदा काही प्रवासादरम्यान काही ठिकाणी नेटवर्क नसते. अशावेळी हे फीचर खूप खास ठरणार आहे.
यावरील चाचणी पूर्ण झाल्यानंतरच वापरकर्ते हे वैशिष्ट्य वापरण्यास सक्षम असतील. टेक जगातील लोकप्रिय टिपस्टर असेंबल डीबगने या फीचरबद्दल माहिती दिली आणि सांगितले की गुगल मॅप सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सध्या बीटा व्हर्जन 11.125 साठी लॉन्च करण्यात आले आहे.
या अपडेटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूजर्स इंटरनेटशिवायही गुगल मॅपवर त्यांचे लोकेशन शेअर करू शकतील, पण यालाही मर्यादा आहे. यामध्ये यूजर्स दिवसातून फक्त 5 वेळा हे लोकेशन शेअर करू शकतील. यासह, दर 15 मिनिटांच्या अंतराने हे शक्य होणार आहे.
गुगल मॅपमधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते. फीचरच्या रोलआउटबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यासोबतच हे फीचर अँड्रॉईड उपकरणाशी कधी जोडले जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.




