आयटीनगरीत आता गव्याचा गवगवा

हिंजवडी – पुणे बावधननंतर आता आयटी नगरी असलेल्या माणगावात गव्याचा प्रवेश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या भल्या पहाटेच गव्याचे दर्शन झाल्याने माण मधील नागरिक भयभीत झाले आहेत.
माण गावातील राक्षे वस्तीवर पहाटे साडेपाचला मुळा नदीकडून गवा आल्याचे जयवंत राक्षे यांनी पाहिले. भल्या पहाटे ते मॉर्निंग वॉकला चालले होते. यावेळी ते फोटो घेण्यासाठी पुढे आले असता गवा त्यांच्या अंगावर धावून आला त्यांनी तत्काळ पळ काढून घरात गेले.
एवढ्यात घरातील अन्य मंडळी बाहेर आली असता तो गवा पांडुरंग राक्षे यांच्या बैलजोडी शेजारी उभा असल्याचे सर्वानी पाहिले.
त्यानंतर अंधारात त्याने नदीच्या दिशेने धूम ठोकली असल्याची माहिती पांडुरंग राक्षे यांनी दिली.
गव्याचा माण गावातील आगमनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तो ठाकर वस्ती किंवा मारणे वस्तीच्या दिशेने गेला असल्याचे लोकांनी पाहिल्याने तो शेतातील उसात लपून बसला आहे की काय या भीतीने माणवासीय मोठ्या चिंतेत आहेत.





