“आता वेळ आहे थांबण्याची…, मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे”; भाजप नेत्याचे जरांगेंना आवाहन

Maratha Reservation Morcha | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. यादरम्यान आता मुंबई पोलिसांनी परवानगी नसल्याने आझाद मैदान खाली करावं असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांनी मुंबई महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणावरुन आंदोलकांची गर्दी कमी केली असून वाहनेही हटवली आहेत. दुसरीकडे, जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही. मी मरेपर्यंत मुंबईतून हटणार नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
याप्रकरणी आता महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आंदोलन थांबवण्यासाठी मनोज जरांगे यांना आवाहन केलं आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “बस… आता थांबा जरांगेजी! ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही,” असे केशव उपाध्ये यांनी म्हंटले आहे. Maratha Reservation Morcha |
बस… आता थांबा जरांगेजी!
ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 2, 2025
आता वेळ आहे थांबण्याची!..
“प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. म. गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यासमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे. आता वेळ आहे थांबण्याची!.. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.”
मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे
“पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व काँग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!, असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. Maratha Reservation Morcha |
हेही वाचा:
आप आमदार पोलिस कोठडीतून फरार ; गोळीबाराचा आरोप, पोलिसांकडून शोध





