ग्राहकांसाठी ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पर्याय उपलब्ध
पिंपरी – करोना संसर्गाला पायबंद घालण्यासाठी शासन स्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीज देयक आकारण्यात येणार आहे. तसेच ग्राहक मोबाइल ऍपद्वारे घरबसल्या मीटर रीडिंग घेऊन त्यानुसारच ऑनलाइन बिल भरू शकतात.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
23 मार्चपासून मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रीडिंग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल आकारावे. या काळात वीज देयकांची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या संकेतस्थळावर वीज देयक उपलब्ध करून देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.
ऑनलाइन सुविधांचा करा वापर
ग्राहकांनी शक्य असल्यास महावितरणचे संकेतस्थळ व मोबाइल ऍपमधील सेल्फ रीडिंग सुविधेद्वारे मीटर रीडिंग पाठवावे. अन्यथा सरासरी वीज वापराचे देयक आकारले जाईल. तसेच छापील वीजदेयक वितरण शक्य नसल्यामुळे आपले वीजदेयक ऑनलाइन पाहावे आणि देयक भरण्यासाठी व इतर सेवांसाठी महावितरणच्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मीटर रीडिंग कसे होईल?
महावितरण मोबाइल ऍपद्वारे ग्राहक घरबसल्या आता आपले मीटर रीडिंग पाठवू शकतात. मीटर रीडिंगनुसारच देयक घेऊ शकतात. नुकतेच महावितरणने मोबाइलऍपचे नवीन व्हर्जन 6.90 खास ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहे. यामध्ये ग्राहकांना नोंदणी करण्याची देखील आवश्यकता नाही. केवळ गेस्ट म्हणून देखील आपले रीडिंग सबमिट करू शकतात. यामध्ये ग्राहकांना आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाइल नंबर महावितरणकडे नोंदलेला असणे आवश्यक आहे.
ग्राहक रीडिंग कधी पाठवू शकतात?
ज्या ग्राहकांचे मोबाइल नंबर महावितरणकडे नोंदलेले आहेत त्यांना रीडिंग सबमिट करण्याचे संदेश पाठवले जातील. असे ग्राहक मेसेज मिळाल्यापासून 5 दिवसांत रीडिंग पाठवू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाइल नंबर महावितरणकडे नोंदणी झालेले नसतील त्यांना मेसेज पाठविला जाणार नाही. त्यांनी आपल्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या बिलावरील चालू महिन्याची रीडिंग तारीख बघावी म्हणजे त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसांत रीडिंग सबमिट करू शकतात. अधिक माहितीसाठी 1912 या टोल फ्री क्रमांकावर फोन करता येईल.
सध्या संचारबंदी लागू असल्याने महावितरणकडून नागरिकांना सरासरी वीज बिल आकारण्यात येणार आहे. नागरिक महावितरणच्या मोबाइल ऍपचा वापर करूनही मीटर रीडिंग नोंदवून त्यानुसार मोबाइल ऍपवर किंवा महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन वीज बिल भरू शकतात.
– एस. पी. टोपे, सहायक अभियंता, महावितरण.