आता महावितरणकडून सामूहिक कारवाई; मोबाइलवर करणार चित्रीकरण

कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सतर्कता; 5 ते 25 अधिकाऱ्यांचा पथकात समावेश
पिंपरी – लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे थकबाकी न भरल्यास महावितरणने वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावला आहे. यात अनेकवेळा नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होत आहेत. कर्मचाऱ्यांवर हल्लेदेखील झाले आहेत. यामुळे सावध पवित्रा घेत आता महावितरणकडून कारवाईसाठी पाठविण्यात येत असलेल्या पथकात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. महावितरणचे अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच-सहा जणांपासून अगदी वीस ते पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक या कारवाईसाठी जात आहे.
करोनाकाळातील दिलेली सरासरी वाढती बिले, त्यानंतर वीज बिल माफीची घोषणा आणि यू-टर्न, अधिवेशनकाळात वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला दिलेली स्थगिती अन् दोन दिवसांत उठवलेली स्थगिती यामुळे महावितरणबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. त्यातच अनेक शेतकरी नेते व राजकीय पुढाऱ्यांकडून थकीत वीज बिल न भरण्याचे नागरिकांना आवाहन केले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरातील महावितरणच्या भोसरी आणि पिंपरी विभागीय कार्यालयांच्या वतीने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
या दरम्यान कारवाईचे मोबाइलवर चित्रीकरण केले जात असल्याने, हा पुरावा ग्राहकांच्या विरोधात ग्राह्य धरला जात आहे. काही दिवसांपूर्वी महावितरणचे पथक वीजतोडीच्या कारवाईसाठी गेले असता, नागरिकांनी विरोध करत या पथकाच्या विरोधातच ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनसमोर ठाण मांडले होते. मात्र, या पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरु करण्यापासूनच्या सर्व घटनाक्रमाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याने हा पुरावा ग्राह्य धरत, विरोध करणाऱ्या नागरिकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत देहूतील वीजतोड कारवाईला विरोध करत नागरिकांकडून महावितरणच्या तंत्रज्ञाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होऊ नये, याकरिता कार्यालयाकडून आवश्यक त्या सुविधा व मनुष्यबळ पुरविले जात आहे.
कारवाईला होणारा विरोध लक्षात घेऊन, पथकातील सदस्य संख्या निश्चित केली जाते. अनेक ठिकाणी वायरमन अन्य कर्मचारी ही कारवाई करतात. मात्र काही ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ शकतो, असे वाटल्यास त्याठिकाणी अगदी 20 ते 25 जणांचे पथक देखील तयार करून कारवाई केली जात आहे.
– शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, पिंपरी





