Chhaava Movie : मध्य प्रदेशसह आता गोव्यातही छावा करमुक्त; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली घोषणा

पणजी : मध्य प्रदेशनंतर आता विकी कौशलचा छावा हा चित्रपट गोव्यातही करमुक्त झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे ही घोषणा केली. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला आहे. महाराष्ट्रात करमणूक कर लागूच नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
प्रमोद सावंत म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित छावा हा चित्रपट गोव्यात करमुक्त होणार आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. हा चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो, ज्यांनी देव, देश आणि धर्मसाठी मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला.
छावा गाठणार 200 कोटींचा टप्पा
विकी कौशलच्या छावा चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला. आता लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरून १९७.७५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. छावा चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे.
याशिवाय, रश्मिका मंदान्ना यांनी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे, डायना पेंटीने जिनत-उन-निसा बेगमची भूमिका साकारली आहे. दिव्या दत्ताने सोयराबाईंची भूमिका साकारली आहे, विनीत कुमार सिंग यांनी कवी कलशची भूमिका साकारली आहे आणि आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारली आहे.





