Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेक्ट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, YRF स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता हॉरर-कॉमेडी यूनिव्हर्सचा भाग होऊ शकते. निर्माते दिनेश विजान यांच्या पुढील चित्रपटाबद्दल आलिया चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही फिल्म म्हणजेच मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी यूनिव्हर्समधील पुढील प्रकल्प ‘चामुंडा’ असल्याचे समजते. दिग्दर्शक अमर कौशिक यांचा खुलासा : ‘चामुंडा’ चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. त्यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “जेव्हा असं खरंच घडेल, तेव्हा सगळ्यांना समजेल. मी आत्ता काहीही नाकारत किंवा स्वीकारत नाही. आम्ही फक्त कथेकडे लक्ष देतो, कलाकारांविषयी नंतर विचार करतो. आमच्याकडे स्क्रिप्ट कलाकारांवर आधारित नसते.” अमर कौशिक पुढे म्हणाले, “प्रेक्षक आमच्याकडून नेहमी काहीतरी वेगळं आणि दर्जेदार अपेक्षित ठेवू शकतात. आम्ही ते अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत. या फिल्म्स आम्ही प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी बनवत आहोत. जर आम्ही काही चूक केली, तर आम्हाला सोशल मीडियावर सांगा आम्ही प्रामाणिक राहून उत्तम सिनेमा देण्याचा प्रयत्न करू. ‘स्त्री’ प्रमाणेच ही फिल्मही ईमानदार असेल.” असं त्यांनी सांगितलं आहे. पुढील वर्षी शूटिंगची शक्यता : बॉलिवूड सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया भट्ट या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. असेही समजते की, या हॉरर-कॉमेडी फिल्मसाठी आलियाने एका मोठ्या साऊथ चित्रपटातून माघार घेतली आहे. ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आलिया ‘चामुंडा’च्या शूटिंगला सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे.