मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसरा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळावा घेण्यासाठी जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसत आहे. आता या वादामध्ये लोकप्रिय अभिनेता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री झाली आहे. त्यांनी “कोणीही कोणत्याही नेत्याच्या दसरा मेळाव्यासाठी जाऊ नये” असे आवाहन केले आहे. इतकच नाही तर यावेळी बिचुकलेने मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख “आता कोण दुसरे आलेत” असा केला आहे.
साताऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी अभिजित बिचुकले यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यासंदर्भातील त्याचे मत काय आहे असे विचारण्यात आले यावेळी बिचुकले यांनी,“दसरा मेळाव्याबद्दल मी एकच सांगेन, सदविवेक बुद्धी असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी घराबाहेर पडू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या हा सण तुम्ही तुमच्या घरी कुटुंबियांबरोबर, समाजाबरोबर आणि मित्र तसेच सहकाऱ्यांसोबत साजरा करा,” असे आवाहन बिचुकले यांनी केले.
तसेच पुढे बोलताना बिचुकले यांनी कोणाचाही थेट उल्लेख न करताना मेळावे घेणाऱ्या राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. “हे जे लोक कोल्हेकुई करतात, नालायकपणा करतात त्यांचे विचार सांगून स्वत:ची खळगी भरतात. त्यांच्या नातवंडांपर्यंत ते सुखी राहतात,” असे बिचुकले म्हणाले. इतकच नाही तर बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. “आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले आहेत,” असे बिचुकलेंनी म्हटले.
त्याचप्रमाणे आपण आता सणासुदीचे दिवस सोडून मेळावे घेणार असून महाराष्ट्रातील समाजाच्या भल्यासाठी काम करणार असल्याचेही बिचुकले म्हणाले. “मी कधीही दसरा मेळावा करणार नाही. मी दसरा, दिवाळी, गुडीपाडवा हे सोडून माझे मेळावे घेईन. आता माझी वेळ आली महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची. प्रत्येकाचा काळ असतो. सर्वांचा काळ गेला. आता अभिजित बिचुकले येईल. एखाद्या धर्माच्या, जातीच्या किंवा प्रांताच्या नाही तर या सर्व समाजासाठी काम करेन,” असे बिचुकले म्हणाले.