300 मशिदी, मंदिरांना लाऊडस्पीकरबद्दल नोटिसा

बेंगळुरू – लाऊडस्पीकरच्या वापराच्या मुद्द्यावरून बेंगळुरूतील पोलिसांनी 301 मंदिरे, मशिदी, चर्च आणि अन्य ठिकाणांना नोटिसा बजावल्या आहेत. निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर लावण्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे बंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
नोटीस बजावण्यात आलेल्या 301 ठिकाणांपैकी 59 पब, बार आणि रेस्टॉरंट आहेत. 12 उद्योग, 83 मंदिरे, 22 चर्च आणि 125 मशिदींना ही नोटीस बजावण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या लाऊडस्पीकरवर कारवाई करावी, अशी मागणी काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून करण्यात येऊ लागली होती. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बेंगळुरू शहरासह अन्य शहरांमधील पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लाऊड स्पीकरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्ष मतपेटीचे राजकारण करत असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने केवळ मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीतच नव्हे तर सर्वच लाऊडस्पीकरच्या आवाजाचे प्रमाण किती डेसिबल असावे, हे निश्चित करून दिले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.





