Sonam Wangchuck : वांगचुक प्रकरणी सरकारला नोटीस; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

Sonam Wangchuck – जोधपूर तुरुंगात असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने केंद्र आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाख सरकारला नोटीस बजावित उत्तर मागविले आहे.
तसेच न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. वांगचुक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या कारणांची प्रत कुटुंबाला देण्यात आलेली नाही.
यावर केंद्र सरकारकडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, अटकेत ठेवण्याची कारणे आधीच अटकेत असलेल्या व्यक्तीला (वांगचुक) देण्यात आली आहेत. वांगचुक यांच्या पत्नीसाठी याची प्रत विचारात घेतली जाईल, असा युक्तीवाद केला.
दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली वांगचुक यांना पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते जोधपूर तुरुंगात आहेत.





