Jagdeep Dhankhar : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधातील नोटीस फेटाळली

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी नोटीस विरोधकांनी सादर केली होती. ती नोटीस गुरूवारी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळली.हरिवंश यांनी दिलेला तीन पानी आदेश राज्यसभेच्या पटलावर मांडण्यात आला. धनखड यांच्या विरोधात नोटीस देण्याची कृती अनुचित, त्रुटींनी भरलेली आणि प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी घाईघाईने करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.
देशाच्या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी नोटीस सादर करण्याचे पाऊल उचलण्यात आले. ती नोटीस वस्तुस्थितीला धरून नाही, अशी भूमिका हरिवंश यांनी घेतली. त्यांच्या आदेशामुळे धनखड यांची कोंडी करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
धनखड पक्षपाती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नसल्याचा आरोप करत विरोधकांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात महाभियोग नोटीस सादर केली. त्या नोटिसीवर विविध विरोधी पक्षांच्या सुमारे ६० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या. राज्यसभेत सातत्याने धनखड आणि विरोधकांमध्ये संघर्ष होताना दिसतो. सभागृहात बोलण्याची पुरेशी संबंधी धनखड देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.





