लक्षवेधी : कॅनडातील वणव्यांच्या झळा

– प्रा. डॉ. विजय कुमार
कॅनडाच्या जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे सुमारे 33 हजार चौरस किमीचा परिसर जळून खाक झाला आहे. गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 13 पट अधिक हानी यंदा झाली आहे.
सबंध जगामध्ये मानवी जीवनात कुठे आणि कोणत्या समस्या कधी उद्भवतील हे सांगता येत नाही. विशेषतः हवामान बदलांच्या आजच्या काळात अशा प्रश्नांची मालिकाच जगाला भेडसावत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कॅनडाच्या जंगलात लागलेली भीषण आग. या आगीचा परिणाम तेथील जवळपास सर्व 10 प्रांतांमध्ये आणि शहरांमध्ये दिसून येत आहे. आतापर्यंत सुमारे 33 हजार चौरस किमीचा परिसर जळून खाक झाला आहे. हे गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 13 पट अधिक आहे आणि बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा मोठे आहे. त्यामुळे 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत. हा वणवा रोखण्यासाठी कॅनडा असमर्थ ठरत आहे. तेथील अग्निशमन दलाच्या मदतीसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांतील एक हजाराहून अधिक अग्निशमन कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांच्या व्यथा मोठ्या बोलक्या आहेत.
त्यांनी म्हटल्यानुसार, आगीच्या वणव्याने केवळ लोक विस्थापित होतातच; पण लोकांच्या घरांची वाताहत होते. त्यांचे जीवनचक्र बदलते. एका ठिकाणी राहात असताना लहानाची मोठी झालेली मुले, कुटुंबाचा सहवास, निसर्गाशी जुळलेले नाते हे सारे जीवनचक्र उद्ध्वस्त होते आणि त्यांना निवाऱ्यासाठी वणवण भटकावे लागते, हे चित्र फार भेदक असते. सध्या कॅनडातील 25 लाख लोक या कठिण प्रसंगातून वाटचाल करत आहेत. आधी या वणव्यातून लोकांना बाहेर काढणे आणि अन्यत्र वसवणे हे कॅनडापुढील आव्हान आहे. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. अशा प्रकारे कॅनडातील जंगलामध्ये वास करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक मोठा अडसर या वणव्याने निर्माण केला आहे.
वणव्याचे कारण काय?
कॅनडाच्या जंगलातील वणव्याचे कारण तेथील संशोधन केंद्राने शोधून काढली आहेत. त्यानुसार कॅनडामध्ये गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि कमी झालेली बर्फवृष्टी यामुळे यंदा तेथील वातावरण नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तापले. पाऊस कमी होता आणि हवेतील उष्णता वाढते तेव्हा जंगलांमध्ये वणवे लागण्यीौ शक्यता वाढते. संपूर्ण जंगलाला आग लावण्यासाठी एक लहान ठिणगी देखील पुरेशी असते. या ठिणग्या झाडांच्या फांद्या घासल्यामुळे किंवा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे अनेक वेळा निर्माण होतात. हा वणवा वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले नाही तर तो सर्वदूर पसरण्यास वेळ लागत नाही. कॅनडाच्या जंगलातही अशाच प्रकारे वणव्यांची मालिकाच सुरू झाली. ती इतकी विस्तीर्ण आहे की, गेल्या 50 वर्षांत अशा प्रकारचा वणवा पाहिला गेला नाही. तेव्हा यामागे जागतिक हवामान बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे असे सांगितले जाते.
हवामानातील बदलामुळे तापमानात वाढ होत असून, त्यातून वणव्यांना पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे “नॅशनल ओशिएनिक अँड ऍटमोस्फेरिक असोसिएशन’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. 2090पर्यंत जगभरातील वणव्यांपैकी 57 टक्के वणवे हवामानातील बदलांमुळे पेटतील, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा विचार करता भविष्यकाळात या प्रकारच्या जंगलांचे रक्षण कसे करायचे हा मानवजातीपुढील एक यक्षप्रश्न बनला आहे. आज कॅनडाच्या मदतीसाठी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ही राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रसंघही धावून आला आहे. येथील विस्थापितांचे पुनर्वसन कसे करायचे, हा प्रश्न ट्रुडो यांच्यापुढे आहे.
वणव्याचे परिणाम
कॅनडातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळेही हवेचा दर्जा खालावला आहे. क्युबेक वन क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांत एवढा मोठा वणवा पाहिला नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्युबेक वन क्षेत्र अमेरिकेच्या सीमेपासून 800 ते 970 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे, वाऱ्याच्या वेगाने या आगीचा धूर अमेरिकेच्या वातावरणात पसरत आहे. अमेरिकेत अनेक शहरातील वातावरण कोरडे असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळेही हा धूर वेगाने वाहात आहे. कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांताजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्रातून चक्राकार फिरणारी हवा क्युबेक वन क्षेत्रातील धूर वेगाने अमेरिकेकडे ढकलत आहे. कॅनडाच्या जंगलातील वणव्याचे दूरगामी परिणाम तेथील आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्वच स्तरावर जाणवणार आहेत.
कॅनडा आणि अमेरिकेतील 10 कोटी लोकांच्या जीवनावर आणि प्रकृतीवर या वणव्याचा परिणाम होतो आहे. विशेषतः न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पेनिसिलव्हेनिया यांसह दहा प्रमुख शहरांवर या धुराचे लोट पसरले आहेत. अगदी न्यू जर्सीपर्यंत ते आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे साथीच्या रोगांच्या काळाप्रमाणे या सर्व भागातील लोक तोंडाला मास्क लावून फिरताना दिसताहेत. कारण अमेरिकेची हवेची शुद्धता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. थोडक्यात, आग कॅनडामध्ये लागली आणि झळ अमेरिकेला बसत आहे.
ज्या नागरी भागातील प्रभागात हा वणवा पेटला आहे तेथील 60 ते 70 टक्के भूभाग व्यापला आहे. 3 लाख हेक्टर क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आता ही सर्व जमीन पुन्हा जंगलमय कशी करायची, शेतीसाठी कशी उपयुक्त करायची आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवनचक्र कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न आफ्रिका आणि आशियातील जंगलांमध्येही अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. 1995 च्या सुमारास ब्राझीलच्या राजधानीत झालेल्या पर्यावरण परिषदेत भारतासारख्या आशियाई देशाने विकसित राष्ट्रांपुढे त्यांनी केलेल्या पर्यावरण विनाशासाठी मदत म्हणून मोठी रक्कम मोजली पाहिजे, असा आग्रह धरला होता. परंतु पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारताच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले.
आता हवामान बदलांचे दुष्परिणाम केवळ आशिया खंडावर नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीसह कॅनडा, इटली यांसह अनेक युरोपियन देशांवर होऊ लागले आहेत. कॅनडातील वणव्याने या राष्ट्रांना एक मोठा धडाच दिला आहे. तापमानात झालेली वाढ आणि हवामान बदल ही वैश्विक समस्या आहे, हे या राष्ट्रांनी लक्षात घेतले पाहिजे. मागील वर्षी युरोपमध्ये अनेक लोक उष्माघाताने मरण पावले. येत्या काळात आशिया खंडात अमेरिकेसारखी थंडी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध प्रकारच्या चक्रीवादळांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जगभरातील मानवी समुदायाने सावध आणि सजग राहून नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला कसा करता येईल याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. 30 वर्षांपूर्वी स्वतःच केलेल्या विकासावर खूश असणारी पाश्चिमात्य राष्ट्रे डोळे उघडून याकडे पहात असली तरी त्यापासून बोध घेतील का हे पहावे लागेल.





