– रंगनाथ कोकणे श्रीमंत गटातील ग्राहकांत आरोग्य आणि चवीवरून वाढलेली जागरुकता पाहता प्रीमियम वॉटरची मागणी वाढत आहे. त्याचवेळी परकी ब्रँडस देखील भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. या ट्रेंडमागे एक कटूसत्यही दडलेले आहे. देशात कोट्यवधी नागरिक आजही सुरक्षित पाण्यापासून वंचित आहेत. हे चित्र सामाजिक असमानता दाखविणारे आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुरुग्राम यासारख्या निवडक शहरांत आलीशान फूड स्टोअर आणि पंचतारांकित हॉटेलध्ये विशेष चवीचे पाणी प्राशन करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणारी मंडळी जगभरातील नामांकित ब्रँडचे पाणी वाइन, कॉफीप्रमाणे तपासत आहेत. या कार्यक्रमातू पाण्यातील मिनरल कंटेट, कार्बोनेशन, खारटपणा आणि चवीबद्धल गांभीर्याने चर्चा होते. सध्या ही बाब भारतातील उच्चभ्रू वर्गापुरतीच मर्यादित आहे. परंतु आगामी काळात त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता अधिक आहे. पाणी आता विशेषाधिकार 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात स्वच्छ पाणी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. संशोधकांच्या मते, देशातील सुमारे 70 टक्के भूजल कोणत्या ना कोणत्या रुपाने दूषित झाले आहे. अनेक शहर आणि वाड्यावर नळातून येणारे पाणी पिण्याजोगे राहिलेले नाही. इंदूरमध्ये गलिच्छ पाणी पिल्याने सोळा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी खळबळ उडविणारी ठरली. अशावेळी बाटलीबंद पाणी भारतातील काही लोकांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. किराणा दुकानात एक लिटरची पाण्याची बाटली वीस रुपयांना मिळते. हे पाणी पेप्सी, कोका कोला, बिस्लरी तयार करतात. पिण्याच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल तब्बल पाच अब्ज डॉलर आहे. यात दरवर्षी 24 टक्क्यांनी वाढ होत आहे. जागतिक पातळीवर बाटलीबंद पाण्याची उलाढाल तीस अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. चीन आणि अमेरिकेसारख्या देशांत होणारी मागणी ही प्रामुख्याने जीवनशैली अणि सुविधेच्या रुपातून होताना दिसते. तेथे दरवर्षी चार ते पाच टक्के वाढ नोंदली जात आहे. या तुलनेत भारतात प्रीमियम पाण्याची मागणी अनेक पटीने वाढताना दिसून येते. बाजारातील रिसर्च कंपनी यूरोमॉनिटरच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रीमियम वॉटरची मागणी 2021 मध्ये केवळ एक टक्का असताना 2025 पर्यंत ती वाढत आठ टक्क्यांवर पोचली आहे. ‘युरोमॉनिटर’चे अधिकारी अमूल्य पंडित यांच्या मते, महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार्या पाण्यावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. केवळ बाटलीबंद पाणीच आरोग्यासाठी उपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे. पंडित यांच्या मते, पाणी महाग असले तरी त्याची मागणी पुढेही वाढणार आहे. जी मंडळी नियमितपणे बाटलीबंद पाणी खरेदी करू शकत नाहीत, ते वॉटर प्युरिफायरची मदत घेतात. मात्र प्युरिफायरमध्ये पाणी स्वच्छ होताना त्यातील नैसर्गिक तत्त्व निघून जाते, असे निरीक्षण आहे. स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणी भारतात आता केवळ स्टिल वॉटरच नाही तर स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणी देखील वाढत आहे. हा ट्रेंड पूर्वी युरोप आणि अमेरिकेपर्यंतच मर्यादित होता. परंतु आता भारतीय ग्राहकांकडूनही त्याला पसंती दिली जात आहे. टाटा समूहाने अलीकडेच स्पार्कलिंग वॉटरचा प्लँट सुरू केला आहे आणि कंपनी भविष्यात स्प्रिंग वॉटरच्या उत्पादनात देखील येण्याची तयारी करत आहे. टाटा अधिकार्यांच्या मते, त्यांच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल दरवर्षी सुमारे 30 टक्के वाढ नोंदवू शकते. भारतात प्रीमियम वॉटर ब्रँड आवा याची विक्री ही मागील वर्षी विक्रमी पातळीवर नऊ दशलक्ष डॉलरपर्यंत पोचली होती. तज्ज्ञांच्या मते, पाण्यासारख्या मूलभूत गरजा केवळ बाजाराच्या भरवशावर सोडणे कितपत योग्य आहे? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा प्रणाली सक्षम करण्यावर भर देण्याचा मुद्दा मांडला आहे. पाण्याची गळती थांबवून स्वच्छ आणि आरोग्यपूरक पाणी देणे आवश्यक असताना लोकांना महागड्या पर्यायाची निवड करण्यास भाग पाडू नये, असेही मत नोंदविले. भारतात बाटलीबंद पाण्याची कहानी आता केवळ तहान भागविण्यापुरती मर्यादित राहिलेले नाही, हे स्पष्ट आहे. या पाण्यावर आता आरोग्य, चव, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक असमानतेचे थर जमा झालेले आहेत. एकीकडे चविष्ट पाणी पिण्याचा बाजार बहरत असताना दुसरीकडे स्वच्छ पाण्यासाठी सर्वसामान्य माणसांची तडफड सुरू आहे. आगामी काळात हे चित्र भारतात संतुलित कसे केले जाईल, हे महत्त्वाचे राहील. बाटलीबंद पाण्याचा बाजार बाटलीबंद पाण्याचा बाजार भारतात आलिशान प्रॉडक्टचे रूप धारण करत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचा बाजार सुमारे 400 दशलक्ष डॉलरपर्यंत पोचू शकतो. तज्ज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता हा बाजार आगामी काळात आणखी वाढू शकतो. प्रामुख्याने उच्च उत्पन्न गटातील लोक आता पाण्याकडे आरोग्याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेला जोडत आहेत. पंचतारांकित हॉटेल्समध्ये भोजनाबरोबरच पाण्याची देखील विचारणा केली जात आहे, हे विशेष. भारतात सर्वात महाग आणि विशेष मिनरल असलेल्या बाटलीबंद पाण्याची किंमत एका लिटरसाठीं 80 ते 100 रुपये आहे. त्याचवेळी परदेशातून आयात बाटलीची किंमत 250 ते 300 रुपयांपर्यंत आहे. या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतानाही त्याची मागणी वाढत आहे.