दखल : गूगलच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

– नित्तेंन गोखले
गूगल सर्च हे गेल्या 20 वर्षांपासून जगभरात माहिती मिळवण्यासाठी सर्वात विश्वसनीय सर्च इंजिन मानले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अचूक उत्तरे देण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बर्याच प्रकरणांमध्ये योग्य कीवर्ड्सचा वापर करूनदेखील शोध परिणाम चुकीचे येतात, तसेच त्यात अविश्वसनीय स्रोतांकडून (वेबसाइट्समधून) पुनर्प्राप्त केलेली माहिती असते अशी अनेकांची तक्रार आहे. सध्या तर दर्जेदार लिखाण व अनुभवी लेखक असलेल्या प्रकाशकांच्या तुलनेत एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरने तयार केलेले लेख असलेल्या वेबसाइट्स गूगल सर्च शोध परिणामांमध्ये चांगले स्थान मिळवतात. शोध परिणामांमध्ये स्पॅम बॉट्सने क्वोरा व्यासपीठावर मांडलेली उत्तरे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टिप्पण्या देखील तज्ज्ञाने मांडलेले मत म्हणून सापडतात. पण एकेकाळी वापरकर्त्यांना उत्तम अनुभव आणि माहिती देऊन नाव कमावलेल्या गूगलवर ही वेळ का आली? अमेरिकेच्या न्याय विभागाने (डिपार्टमेंट ऑफ जस्टीस) गूगल विरोधातील खटल्याचा एक भाग म्हणून जारी केलेल्या माहितीत याचे उत्तर दडले आहे. याचबरोबर, जर्मनी येथील तज्ज्ञाने मांडलेली तथ्येदेखील गूगलच्या घसरत्या गुणवत्ता मागील कारणांवर प्रकाश पाडतात.
काय दर्शवितो जर्मन अभ्यासकांचा गूगल सर्चबाबतचा अहवाल?
सेंटर फॉर स्केलेबल डेटा अॅनालिटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बौहॉस-युनिव्हर्सिटी वायमर आणि लीपझिग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काही दिवसांपूर्वी गूगल सर्चबाबतचा अहवाल जगासमोर मांडला. अभ्यासाचा भाग म्हणून डकडकगो, बिंग आणि गूगल सारख्या विविध सर्च इंजिनांवर एका वर्षाच्या कालावधीत 7,392 प्रॉडक्ट रिव्हिव सर्च करून रिझल्ट्सचे निरीक्षण करण्यात आले. गूगलने इतर सर्च इंजिनच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे दिसले. परंतु प्रथम श्रेणीत असलेल्या बहुसंख्य वेबसाइट एसईओ स्पॅम असल्याचे आढळले. थोडक्यात, कमी दर्जाचे लिखाण व चुकीची माहिती असलेल्या वेबसाइट गूगलने वापरकर्त्यांना सर्च रिझल्टमध्ये दाखवून दिशाभूल केल्याचे समजले.
अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टीसची गूगल विरोधात केस
अमेरिकेचा न्याय विभाग (डिपार्टमेंट ऑफ जस्टीस) देशात विविध कायद्यांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अमेरिकन बाजारपेठेत निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देणे हे देखील या विभागाचे काम आहे. डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने गूगल विरोधात अनेक खटले लावले आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल केलेल्या खटल्यात गूगलने बाजारात स्पर्धा संपवली तसेच ऑनलाइन प्रकाशक, ग्राहक, जाहिरातदार यांचे नुकसान केल्याचा दावा लावला आहे. या प्रकरणाचा एक भाग म्हणून, न्याय विभागाने गूगलच्या अधिकार्यांनी एकमेकांना पाठविलेल्या अनेक ईमेल्सचा मजकूर सार्वजनिक केला.
पण या ई-मेलमधील मुख्य मुद्दे आहेत तरी काय? सर्वप्रथम असे दिसून येते की, गूगल सर्च विभागाचे नेतृत्व करताना बेनेडिक्ट (बेन) गोम्स यांचा जोर कायम सर्च रिझल्ट गुणवत्ता उत्तम ठेवण्यावर होता. त्याकाळी, सर्च टीम बेन गोम्स यांच्याकडे, तर राघवनच्या नेतृत्वाखाली गूगल अॅडव्हर्टिसिंग टीम काम करायची. राघवन सगळ्यांना सर्च इंजिन अॅड (जाहिरातीतून) उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला सांगायचे. त्यांना शोध परिणामांची गुणवत्ता टिकवण्यात फारसा रस नव्हता. या कारणाने दोन्ही विभागांचा एकमेकात कायम वाद चालायचा. पण 2019 मध्ये गोम्स यांना सर्च विभाग प्रमुख पदावरून हटवून राघवन यांना सर्च विभागाची जबाबदारी देण्यात आली.
गूगल सर्च विभागाचे प्रमुख झाल्यावर प्रभाकर राघवन यांनी कंपनी सीईओ सुंदर पिचाई बरोबर मिळून सर्च इंजिनमधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शोध परिणाम आणि युझर एक्सपिरीयन्सचा कसा बळी दिला हे या अंतर्गत चर्चांच्या ई-मेलमधून समजते. तेव्हापासून जास्तीत जास्त फायदा कमावण्याच्या नादात गूगल सर्चमध्ये अनेक बदल करण्यात आले. स्वतःची अनेक धोरणे मोडली तर काही तडजोड केली. सध्या गूगल सर्च इंजिनकडून मुख्य कंपनी अल्फाबेटला दररोज 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई होत असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक फायदा झाला पण प्लॅटफॉर्मने लोकांचा विश्वास गमवायला सुरुवात केली. या विषयावर अनेक टेक ब्लॉगर्सने गूगलचे कान पिळलेत.
गुणवत्ता पारखणार्या तज्ज्ञांना दाखवला दरवाजा
कॅलिफोर्निया स्थित वरिष्ठ पत्रकार एड झिट्रॉन यांनी टेक ब्लॉगमुळे स्वतःची मोठी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांत गूगल सर्च प्लॅटफॉर्मचा दर्जा कसा खालावत आहे यावर लक्ष केंद्रित करणारी केस स्टडी झिट्रॉनने ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडली. झिट्रॉन यांच्यानुसार, गूगल न्यूज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बातम्यांसाठी टेक-गेट नावाच्या संकेतस्थळावरील लेख रिझल्ट्समध्ये सर्वप्रथम दाखविते. टेक-गेटला माहितीचा कायदेशीर आणि विश्वसनीय स्रोत म्हणून लेबल केले जाते. पण प्रत्यक्षात, टेक-गेट वर असलेले लेख इतर वेबसाइटवरून चोरलेले आहेत. या वेबसाइटकडे स्वतःचे लेखक किंवा पत्रकार नसून, कोणत्याही न्यूज एजन्सीबरोबर करार न करता दुसर्याच्या लेख व बातम्यांचा बेकायदेशीर वापर यावर होताना दिसतो. काही लिखाण चॅट जीपीटीचे देखील आहे. तरीही, गूगल सर्च अशा लिखाणाला विश्वासार्ह, मानवी-लिखित बातम्या म्हणून रेट करते. पण पुढील काळात परिस्थिती बदलेल का? तसे वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे गूगलने काही दिवसांपूर्वी अॅपेन या ऑस्ट्रेलियन एजन्सीसोबतचा आपला करार रद्द केला.
अॅपेन कंपनीचे अनुभवी सर्च विशेषज्ञ विविध प्रकारची माहिती गूगल सर्च इंजिनचा वापर करून मिळवायचे व सर्च रिझल्ट्सची गुणवत्ता तपासायचे. सर्च रिझल्ट्समध्ये उच्च दर्जाच्या संकेतस्थळांचा समावेश होतो ही खात्री करायचे. याची गुणवत्ता नियंत्रणात महत्त्वाची भूमिका असायची. पण, गूगलने खर्च कमी करायला, शेअरधारकांना फायदा वाढवून दाखवायला अॅपेनचा करार रद्द करून तज्ज्ञांना दरवाजा दाखवला. गूगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सामावून घेतले. पण सर्च इंजिनची क्षमता वाढण्याऐवजी चुकीच्या उत्तरांचे प्रमाण वाढले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान अद्याप परिपूर्ण नाही. अशा वेळेस थोडाफार खर्च वाचवायला गुणवत्ता नियंत्रणास नेमलेले लोक काढून एआयवर सगळे सोपाविणे कितपत योग्य ठरेल हा विचार करण्याचा विषय आहे. या बदलांमुळे इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याच्या आपल्या क्षमतेचे निश्चितपणे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या या खुलाशांमुळे उत्पन्नात वाढ करण्याचे लालच सोडून गूगलला पुन्हा एकदा युजर एक्सपीरियन्स सुधारण्यावर भर द्यावा लागेल यात शंका नाही. तसे न केल्यास अल्फाबेटच्या एकूण वर्चस्वाला धक्का लागू शकतो, कारण चॅट जीपीटी, को-पायलट आणि इतर प्लॅटफॉर्म ‘गूगल सर्च’ला उत्तम पर्याय म्हणून आव्हान देत आहेत.





