राज्यपाल नव्हे, तर मुख्यमंत्री राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती; ममता सरकारकडून ठराव मंजूर

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांचा अधिकार काढून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्व विद्यापीठांच्या कुलपती बनल्या आहेत. त्या विषयीचे विधेयक आज पश्चिम बंगाल विधानसभेत 182 विरुद्ध 40 मतांनी मंजूर करण्यात आले.
राज्याचे मंत्री ब्रत्य बसू यांनी हे विधेयक सादर केले. हे विधेयक मांडताना ते म्हणाले की, जर पंतप्रधान हे केंद्रीय विद्यापीठांचे कुलपती होऊ शकतात तर राज्यातील विद्यापीठांच्या मुख्यमंत्री कुलपती होण्यात काहीही गैर नाही.
विद्यमान राज्यपालांनी कुलपती या नात्याने आपली जबाबदारी नीटपणे पार पाडली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्य सरकारला विश्वासात न घेताच अनेक राज्यांच्या कुलगुरूंची नियुक्ती केली होती. तेव्हापासून राज्यपालांचे विद्यापीठ क्षेत्रातील अधिकार कमी करण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला होता.





