शासन नव्हे ‘दुष्काळ आपल्या दारी’! जयंत पाटील यांचे शिंदे सरकारला खडेबोल

मुंबई – राज्यातील संभाव्य दुष्काळ स्थितीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यस्त असणाऱ्या राज्य सरकारला दुष्काळ आपल्या दारी येऊन ठेपलाय याची पुसटशी जाणीव तरी आहे का? असा तिखट सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे.
जयंत पाटील यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे म्हटले, सद्य:स्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.
खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे, असेही पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
अर्ध्या महाराष्ट्राला फटका
मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. याचा सर्वाधिक फटका राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांना, म्हणजेच जवळपास अर्ध्या महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे राज्यावरील दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.
तांत्रिकदृष्ट्या पावसाळा अद्याप महिनाभर बाकी आहे. या कालावधीत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पण ही केवळ शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने तत्काळ संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी योग्य ती उपाय योजना करण्याची गरज आहे.





