एक्स्प्रेस-वे नव्हे, हा तर मृत्यूचा महामार्ग

आठ महिन्यांत 22 मृत्यू; 48 गंभीर जखमी
– कल्याणी फडके
पुणे – पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली असली, तरी अवघ्या 8 महिन्यांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 38 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गंभीर जखमी झालेल्यांची संख्या 21 वरून तब्बल 48 इतकी झाली आहे. महामार्गावर वेगाचे बंधन न पाळणे, लेनची शिस्त न पाळणे आदी कारणांमुळे जीवघेणे अपघात होत आहेत. तब्बल 80 ते 85 टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे होत असल्याचे पुढे आले आहे.
80 ते 85 टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे
मागील वर्षी द्रुतगती मार्गावर जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 87 अपघात झाले होते. तर यंदा एकूण 63 अपघात झाले. या मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या घटल्याचे चित्र आहे. मात्र, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे गावच्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये 2 जणांना नाहक जीव गमवावा लागला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा “एक्स्प्रेस वे’बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या नादुरूस्त चारचाकीला “लक्झरी’ बसने धडक दिली. यामध्ये पुण्यातील स्पाइन सर्जन डॉ. केतन खुर्जेकर आणि चालक ज्ञानेश्वर भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते म्हणाले, “या अपघातामध्ये बसचा वेग अधिक होता. बसचालकाने डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष आहे.’
रिफ्लेक्टर आवश्यकच
वाहनचालकाने गाडीमध्ये “रिफ्लेक्टर’ त्रिकोण, पट्टी आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. गाडी बंद पडल्यास किंवा वाहन थांबवल्यास या साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना “रिफ्लेक्टर’मुळे वाहन असल्याचे संकेत मिळतील. वाहन खरेदी करताना आवर्जुन ग्राहकांनी “रिफ्लेक्टर’ची मागणी करावी, असे मोहिते यांनी
नमूद केले.
वाहनचालकांनो, काय दक्षता घ्यावी
लेनबाबतची शिस्त पाळावी.
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये.
गाडीची देखभाल केली पाहिजे.
गाडीत “सेफ्टी मेजर्स’ असल्याची खात्री करावी.





