Nagar | तलाठी नव्हे आता ‘ग्राम महसूल अधिकारी’

नगर, {जयंत कुलकर्णी} – तलाठ्यांचे काम महत्त्वाचे, तांत्रिक स्वरूपाचे असल्याने त्यांचे पदनाम बदलून आधुनिक आणि प्रतिष्ठेचे असावे, अशी मागणी तलाठी संघटनेकडून होत होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, पदनामात आता बदल झाला आहे.
त्यानुसार तलाठ्यांना ‘ग्राम महसूल अधिकारी’, अव्वल कारकुनांना ‘सहायक महसूल अधिकारी’ तर कोतवालांना ‘महसूल सेवक’ अशाप्रकारे पदनाम दिले आहे. तसा शासन निर्णय 14 ऑक्टोबरला घेण्यात आला आहे.
तलाठी हे पदनाम जुनेपणाचे, कमी प्रतिमेचे, सामाजिक प्रतिष्ठेसाठी कमी महत्त्वाचे समजले जाते. त्यांच्या कामाच्या स्वरूपात अनेक सुधारणा होऊनही नाव जुनेच राहिले होते.
महसूल गोळा करणे, जमिनीची नोंद ठेवणे एवढेच त्यांचे काम मर्यादित नाही, तर जिल्हाधिकार्यांनी नमूद केलेली नोंदणीपत्रके, रजिस्टर, जमा-खर्च लिहिणे, अशी कामे त्यांना करावी लागतात. त्यातूनच तलाठी पदनामात बदल करण्याची मागणी संघटनेकडून होत होती.
त्यानुसार शासनाने तलाठी ऐवजी ‘ग्राम महसूल अधिकारी’ असा बदल केला आहे. महसूल विभागांतर्गत येणारे अव्वल कारकून हे सुद्धा महत्त्वाचे पद. या संवर्गास महसूल, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा, स्वच्छता,
गृह, सामाजिक न्याय विभागामार्फत राज्य, केंद्रपुरस्कृत योजना, ग्राहक सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा, रोजगार हमी योजना विभागामार्फत नेमून दिलेली कामे पार पाडावी लागतात.
तसेच विविध मसुदे तयार करणे, जमीन महसूल दस्तऐवजांच्या नोंदी, एकत्रिकरण, अद्ययावतीकरण, प्रमाणपत्रांची तपासणी, नैसर्गिक आपत्ती काळात मदत, पुनर्वसनाचे काम, कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे आदी कामे पार पाडावी लागतात.
यासाठी अव्वल कारकून संवर्गास विशिष्ट पदनाम असणे आवश्यक होते. तशी मागणी संघटनेकडून होत होती. त्यानुसार शासनाने त्यांनाही ‘सहायक महसूल अधिकारी’ असे पदनाम दिले आहे.
गावच्या सुरक्षेसाठी, शिस्तीसाठी जबाबदार असणारा स्थानिक अधिकारी म्हणून तलाठी कार्यालयातील कोतवाल पदाकडे पाहिले जाते.
प्रशासनाला सहकार्य करताना तलाठी आणि पोलीस यांच्यासाठी समन्वय साधत त्यांचे काम चालते; परंतु आतापर्यंत त्यांच्या पदनामात बदल झालेला नव्हता. अखेर त्यांच्या पदनामातही बदल करून कोतवाल ऐवजी ‘महसूल सेवक’ असा बदल शासनाने केला आहे.
तलाठीपदाची पूर्वीची पात्रता दहावी उत्तीर्ण होती. 2010 पासून ती पदवीधर केली आहे. त्यामुळे बदलत्या शैक्षणिक पात्रतेनुसार तलाठी ऐवजी ग्राम महसूल अधिकारी’ अशी राज्य संघटनेची मागणी होती. महसूल विभागात गावपातळीवर काम करणारे हे पद आहे.
तसेच ग्रामपंचायतपातळीवर ग्राम विकास अधिकारी हे पद आहे. यापूर्वी कामगार तलाठी हे पद होते. पण आता तलाठी कामगार राहिलेला नाही.
ऑनलाईन कामांमुळे त्यांची काम करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी पदनाम करण्याची मागणी होती.राज्य सरकारकडून ती मान्य झाली आहे. – प्रशांत हासे जिल्हाध्यक्ष, राज्य तलाठी संघ.


