‘रस्त्याचे फूटभरही काम झाले नाही’

पुणे/फुरसुंगी – मंतरवाडी-उंड्री पिसोळी-खडीमशीन चौक या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे साधारण 1300 ते 1400 मीटरचे काम उरलेले असताना ते ही यांना होत नाही. माझ्यावर त्या काळात टीका टिप्पणी करणाऱ्यांना गेल्या वर्षभरात राहिलेले 1300 मीटर तर दूरच पण, रस्त्याचे 100 फूट सुद्धा काम करता आलेले नाही, अशी टीका पुरंदर-हवेलीचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.
मंतरवाडी ते खडीमशीन चौक रस्त्याचे काम रेंगाळले असून अनेक अपघात घडले आहेत. याकरीत या गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून आश्वासना शिवाय काहीच मिळत नसल्याची वस्तस्थिती आहे.
याबाबत माजी आमदार शिवतारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मी आमदार असताना माझ्या कार्यकाळात 66 कोटींचा निधी मी मंजूर करून घेतला होता. यापैकी 5 किलोमीटर काम पूर्ण झाले असून केवळ 1300 ते 1400 मीटर काम बाकी आहे. गेल्या वर्षभरापासून काहीच काम झालेले नाही प्रचंड ट्रॅफिक, जीवघेणे अपघात आणि धुळीचे लोट यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या कामासाठी उर्वरीत निधी लवकरात लवकर वर्ग करून काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्राद्वारे केली आहे.
याबाबत शिवतारे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे कॉंग्रेस पक्षाचेच असून हा विषय त्यांच्या मंत्रालयाकडे येतो. परंतु, पाठपुरावा दुसरीकडेच केला जात आहे. ही गोष्टही समजत नसेल तर फार मोठी शोकांतिका आहे. मी स्वतः अनेकदा रात्री रस्त्यावर उभे राहून काम करून घेतले आहे. दिवसभर वाहतुकीमुळे कामात अडथळे येतात. रात्री जास्तीत जास्त काम उरकण्यावर भर दिल्याने या रस्त्याचे बहुतांश काम तरी पूर्ण झाले. उर्वरित काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.





