चंडिगढ – आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या हितासाठी अविरत कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. एकही दिवस वाया जाऊ देणार नाही. आजच कार्याचा प्रारंभ होईल. आधीच 70 वर्षांचा विलंब झाला आहे, असे ते म्हणाले.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 48 वर्षीय मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. खटकड कलॉं या शहीद भगतसिंग यांच्या गावी झालेल्या शपथविधी सोहळ्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहिला. भगतसिंग नेहमी परिधान करायचे तशी पिवळ्या रंगाची पगडी मान आणि उपस्थितांपैकी अनेकांनी घातली होती. त्यामुळे शपथविधी सोहळ्यात पिवळ्या जनसागराचे दर्शन घडले. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्या सोहळ्याला उपस्थित राहिले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मान यांनी सभेत बोलताना भ्रष्टाचार आणि बेरोजगारीविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. आपचे कार्यकर्ते मग्रूर बनल्याची एकही बातमी पुढे येऊ नये. कार्यकर्त्यांनी विनम्रतेने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले. मान यांनी एकट्यानेच शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी नंतर होईल.
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मान यांनी तातडीने त्या पदाचा कार्यभारही स्वीकारला. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून आपने पंजाबची सत्ता काबीज केली. त्या राज्यातील विधानसभेच्या एकूण 117 पैकी 92 जागा जिंकत आपने तीन-चतुर्थांश बहुमत मिळवले. आता दिल्लीनंतर पंजाबच्या रूपाने देशातील दुसऱ्या राज्यात आपचे सरकार बनले आहे.