‘बीआरटी’ नव्हे, कचराकुंडीचे ठिकाण!
स्वारगेट-हडपसर मार्गाची व्यथा कायम
पुणे/ हडपसर – “बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिस्ट) मार्ग म्हणजे काय असते, हेच बहुतेक कोणाला कळलेले नाही. त्यामुळे स्वारगेट ते हडपसर हा मार्ग “बीआरटी’ मार्ग म्हणून ओळखला जातो, हेच कळत नाही. या मार्गावर कोठेही तशी जाणीव होत नाही. एकंदरीत या मार्गावरील “बीआरटी’चा फज्जा उडाला असून हा मार्ग भंगार आणि कचराकुंडीचे स्थान बनला आहे.
पुणे शहरात काही वर्षांपूर्वी स्वारगेट ते हडपसर आणि स्वारगेट ते कात्रज हे दोन रस्ते “बीआरटी’ मार्ग म्हणून घोषित करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावरील या दोन मार्गांवरील कात्रजपर्यंतचा मार्ग तरी काही प्रमाणात सुरू आहे, पण हडपसरपर्यंतचा मार्ग पूर्णपणे बंदच पडला आहे.
सुरुवातीपासूनच या मार्गांचे नियोजन चुकले आहे. “बीआरटी’ मार्ग म्हणजे, त्या रस्त्याचे रुंदीकरण करुन पदपथ, सायकल ट्रॅक, रस्ता आणि त्यामधोमध “बीआरटी’मार्ग अशी साधरणत: संकल्पना असते. पण, या संकल्पनेनुसार हडपसर रस्ता कुठेच दिसत नाही.
स्वारगेट पीएमपी कार्यालयापासून हा रस्ता सुरू होत असला, तरी तेथे आता काहीच राहिलेले नाही. उलट ग्रेड सेपटरमुळे “बीआरटी’ मार्गच उरलेला नाही. तेथून पुढे शंकरशेठ रस्त्याने गोळीबार मैदानापर्यंत जाईपर्यंत “बीआरटी’ दिसत नाही. तेथून पुढे तर कॅन्टोन्मेंट हद्द सुरू होते. रेसकोर्स हद्दीपर्यंत “बीआरटी’ मार्गच अस्तित्वात नाही.
तेथून पुढे भैरोबानाला चौक ते फातिमानगर चौकापर्यंतही “बीआरटी’ नाही. तर, फातिमानगर चौक ते रामटेकडी पोलीस चौकीपर्यंत सायकल ट्रॅक, फुटपाथ आणि “बीआरटी’ मार्ग आहे, पण त्याचा काहीच उपयोग नाही. कारण या मार्गावरील फुटपाथवर कार बाजार भरतो.
तर दुसऱ्या बाजूला फळ विक्रेते बसतात. तर काही ठिकाणी महावितरणचे डी.पी. सुद्धा फुटपाथवरच आहेत. काळूबाई चौक ते रामटेकडीपर्यंतचा “बीआरटी’ मार्ग नुकताच पालिकेने उखडून टाकला आहे.
अतिक्रमणे कोण हटवणार?
मगरपट्टा सिटी ते गाडीतळदरम्यान “बीआरटी’चे प्रयोजन असलेल्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. विशेष करुन याठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलाखालून बसेस जाण्यासाठी “बीआरटी’ मार्ग सुरू करण्यात येणार होता, पण तो कागदावरच राहिला आहे. उलट या उड्डाण पुलाखालील जागा म्हणजे भंगारातील वाहने उभी करण्याचे ठिकाण आणि जाता येता कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे आता स्वारगेट ते हडपसर हा मार्गावर बीआरटी आता राहिलाच नाही, अशी स्थिती आहे.





