Nora Fatehi: नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या ‘सरके चुनर’ गाण्यामुळे चर्चेत आहे. कन्नड चित्रपट ‘केडी द डेविल’मधील या गाण्यावर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावल्यानंतर नोरा फतेही आयोगासमोर हजर झाली. यावेळी तिने सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. महिला आयोगाबाहेर माध्यमांशी बोलताना नोरा म्हणाली की, “माझा उद्देश कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा नव्हता.” एक कलाकार म्हणून आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवी होती, अशी कबुलीही तिने दिली. “माझ्याकडून झालेल्या गोष्टीबद्दल मी मनापासून माफी मागते,” असेही ती म्हणाली. नोरा फतेहीने सांगितले की, महिला आयोगाच्या सदस्यांनी तिची बाजू शांतपणे आणि संवेदनशीलतेने ऐकून घेतली. आयोगासोबतची चर्चा सकारात्मक वातावरणात झाली आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे तिने सांगितले. या संपूर्ण वादातून आपण एक मोठा धडा घेतल्याचेही नोरा म्हणाली. (Nora Fatehi) Nora Fatehi: वादानंतर नोरा फतेहीची माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी या घटनेनंतर समाजासाठी काही चांगले करण्याचा निर्णय घेतल्याचे नोरा फतेहीने जाहीर केले. तिने काही अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. तिच्या मते, हा निर्णय तिच्यासाठी खूप भावनिक आणि जबाबदारीचा भाग आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजात सकारात्मक योगदान द्यायचे असल्याचे तिने सांगितले. ‘सरके चुनर’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर टीका केली होती. काही लोकांनी या गाण्यात महिलांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अशा प्रकारच्या गाण्यांमुळे अश्लीलतेला प्रोत्साहन मिळत असल्याचेही म्हटले गेले. वाद वाढल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत नोरा फतेहीला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले होते. याआधी या प्रकरणात संजय दत्त यांनाही महिला आयोगासमोर हजर राहावे लागले होते. त्यांनीदेखील माफी मागत 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली होती. सध्या नोरा फतेहीची माफी आणि अनाथ मुलींसाठी घेतलेला निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केले असून समाजासाठी सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. (Nora Fatehi)