No-Wash Hair Tips : केस न धुता मिळवा ताजेतवाने लूक, घरच्या घरी करा हे सोपे उपाय

No-Wash Hair Tips: धावपळीच्या जीवनशैलीत रोज किंवा दोन दिवसांनी केस धुणं अनेकदा शक्य होत नाही. त्यातच पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे केस पटकन तेलकट आणि चिकट होतात.
यामुळे केसांची हवी तशी स्टाईल करणे कठीण जाते आणि संपूर्ण लूकवर परिणाम होतो. मात्र, काही घरगुती उपाय करून तुम्ही केस न धुताही त्यांचा चिकटपणा कमी करून त्यांना ताजेतवाने आणि सुटसुटीत दिसू शकता.
गुलाबपाणी
केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी गुलाबपाणी हा उत्तम पर्याय आहे. एका स्प्रे बाटलीत गुलाबपाणी भरून ठेवा आणि जेव्हा केस तेलकट वाटतील तेव्हा स्कॅल्प व केसांवर हलकासा स्प्रे करा. हलक्या हाताने मसाज करून फणीने विंचरा. यामुळे केस ताजेतवाने राहतील आणि सुगंधीही होतील.
ब्लॉटिंग पेपर
अचानक बाहेर जायचं ठरलं आणि केस तेलकट दिसत असतील तर ब्लॉटिंग पेपर वापरा. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी वापरण्यात येणारा हा पेपर स्कॅल्पवरील तेलही शोषून घेतो. हलक्या दाबाने स्कॅल्पवर लावल्यास केस लगेच ताजेतवाने दिसतील.
टॅल्कम पावडर
तसेच, टॅल्कम पावडरही उपयुक्त ठरते. थोडी पावडर केसांवर शिंपडून हेअर ब्रशने विंचरा. अतिरिक्त पावडर झटकून टाका जेणेकरून केस राखाडी दिसणार नाहीत. मऊ दात असलेल्या ब्रशने स्कॅल्प स्वच्छ केल्याने अतिरिक्त तेल कमी होईल आणि केस सुटसुटीत व चमकदार दिसतील.
हे सोपे हेअर हॅक्स अवलंबून तुम्ही केस न धुता देखील आकर्षक आणि स्वच्छ लूक मिळवू शकता.

