रूपगंध: टाल्कम पावडर

‘टाल्कम पावडर’ हे शीर्षक घेऊन काय ललित लेखन करणार? असा संभ्रम रसिकांना पडला असेल. पण मला मात्र या लेखाला काय शीर्षक द्यावं? असा संभ्रम पडला होता. कारण नुसतं “पावडर’ म्हटल्यावर रंगाच्या जितक्या छटा, तितके पावडरचे प्रकार डोळ्यासमोर येतील.
दात घासायच्या पावडरला मंजन, मिसरी असे पर्यायी शब्द रोजच्या रोज वापरले जायचे. पण भाषेच्या अध:पतनाच्या काळात कितीतरी मराठी शब्द मृत झाले. मंजन, मिसरी हे शब्द काळाच्या ओघात हरवून गेले. आणि दात घासण्याच्या पावडरला निव्वळ पावडर हा शब्द रूढ झाला.
शब्द कसे रूढ होतात याचं एक फार गंमतीशीर उदाहरण मागल्या चार-पाच महिन्यांत घडून गेलं आणि गांज्याला हर्बल वनस्पती हे नाव प्राप्त झालं. काही वर्षांनी हर्बल पावडर म्हणत गांजाची पावडर सुपरमार्केटमध्ये खुलेआम विकली गेली तर आश्चर्य वाटायला नको. असं घडलं तर दात घासण्याची पावडर, भांड्याची पावडर, कपडे धुण्याची पावडर या पावडरींच्या यादीत हर्बल पावडरसुद्धा मांडीला मांडी लावून बसेल. हर्बल पावडरचा आपल्याला वाससुद्धा नको. त्यामुळे आपण आपल्या टाल्कम पावडरकडे अर्थात चेहऱ्याला फासण्याच्या पावडरकडे वळू.
हा लेख लिहिताना काही संदर्भ चाळत होतो. ललित लेखन करताना तांत्रिक बाबी तपासात बसण्याची फारशी गरज नसते. पण पावडरच्या जन्माविषयी सांगायलाच हवं. पावडरचा जन्म 1894 साली झाला आहे. पण हे किती जणांना माहीत असेल? शक्यता कमीच. माझ्या पत्नीला तर अजिबात माहीत नसेल अशी खात्री होती म्हणून मी तिला माहिती पुरवली. तर ती म्हणाली, “दादाच्या म्हणजे आमच्या मोठ्या चिरंजीवाच्या आदेशाच्या जन्माच्या आधी शंभर वर्षे पावडरचा शोध लागला आहे. आता यापुढे पावडरचा शोध कधी लागला, हे कधीही विसरणार नाही.’ आणि मी देखील विसरणार नाही. संदर्भ कसा लक्षात ठेवावा याचं यापेक्षा उत्तम दुसरं उदाहरण मला तरी माहीत नाही. (यापुढे पावडर म्हणजे टाल्कम पावडर असंच गृहीत धरावं. मंजन की काय असं मनातही आणू नये.)
आमच्या लहानपणी सौंदर्य प्रसाधनं होती कुठे? त्यामुळे शाळेत जाताना आई चेहऱ्यावर पावडर थापायची. आम्ही गोरे गोमटे होऊन शाळेत जायचो. एक हलकासा मंद सुवास नाकाभोवती झोके घ्यायचा. मस्त वाटायचं. पुढे पावडर ही एका खनिजापासून बनवली जाते. त्यात ऍसबेसटॉस असतं. ऍसबेसटॉस हे कर्णरोगाला कारणीभूत ठरू शकतं हेही कळलं. पण “सिगारेट ओढणे आरोग्यास घातक असून त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो’ असा इशारा पाकिटावर छापलेला असूनही लोक सिगारेट ओढतातच की. पावडरच्या डब्यावर तर तसा कोणताही इशारा छापलेला नसतो. त्यामुळे मी डोळे मिटून पावडर लावतो.
कुणी डोळे उघडे ठेवून पावडर लावत असेल तर सांगा? तर शाळकरी वयात आमच्या अंगाला चिकटलेल्या पावडरने अजूनही आमचं अंग सोडलं नाही. मी अजूनही नित्यनेमाने पावडर लावतो. अजूनही म्हणजे “म्हातारा इतुका न मी, अवघे पाऊणशे वयमान’ असं काही नाही बरं का! बुद्धी नाठी व्हायला साठीपासून मी दोन-चार कासरे दूर आहे. एक प्रकाशवर्ष म्हणजे 946 वर शून्याचा 0,000,000,000 एवढा ढीग लावल्यावर जेवढे किलोमीटर भरतील तेवढे किलोमीटर अशी व्याख्या विज्ञानाने मान्य केली आहे. तशी एक कासरा म्हणजे एक वर्ष अशी व्याख्या या लेखापुरती गृहीत धरायला हरकत नसावी. असो.
परवा मी माझ्या साडूंकडे गेलो होतो. वास्तवात मेव्हणीकडे गेलो होतो असं लिहायचं होतं. पण तसं लिहिलं असतं तर काही वाचकांच्या चष्म्याचा रंग उगाचच गुलाबी झाला असता. मनात गुलाबी तरंग उमटतात. मनात गुलाबी तरंग उमटणं हे “अजून यौवनात मी’ असल्याचं लक्षण आहे. त्यामुळेच तसे तरंग उमटण्याची शक्यता असलेल्या रसिकांनी, “मी माझ्या मेव्हणीकडे गेलो होतो’, असं वाचायला हरकत नाही. संध्याकाळी आम्ही बाहेर निघणार होतो. मी चेहऱ्यावरून पाणी फिरवलं. नॅपकिनने चेहरा स्वच्छ केला. तर मेव्हणी म्हणाली, भाऊजी पावडरचा डबा तिथे, त्या डाव्या बाजूच्या कप्प्यात आहे.
जवळ जवळ सहा महिन्यांनंतर मी त्यांच्याकडे गेलो होतो. तरीही आठ-एक इंच उंचीच्या त्या डब्यातली पावडरची मात्रा पाच-पंचवीस अणू-रेणूंनी कमी झाल्याचं जाणवत नव्हतं. त्या विषयी मी तिला विचारलं तर ती म्हणाली, भाऊजी आम्ही दोघेही पावडर लावत नाही. मी मात्र नियमित पावडर लावतो. अंगावर सेंट मारण्यापेक्षा पावडर लावणं मला अधिक आवडतं. कारण काय तेही सांगतो. एकतर सुवास तर येतो आणि दुसरं म्हणजे रंग उजळतो. असं मी म्हणालो आणि घरभर हसू सांडलं. भिंतीसुद्धा हसत असल्याचं मी बघितलं.
अत्तरापेक्षा पावडर स्वस्त असते. त्यामुळे पावडर वापरणं माझ्या खिशाला झेपतं. कोणत्याही व्यक्तीला एका वेळेला किती पावडर लागत असेल? …फार फार तर गुंजभर. कृष्णवर्णीय म्हटल्यावर आपल्यातला कृष्ण डोकावतो. पण गुंजभर पावडर म्हटल्यावर चेहऱ्यावर सोनं थापल्याचा फील अजिबात येत नाही बरं का! अगदी गुंज हे सोन्याचं परिमाण असलं तरी. मेव्हणीकडचा पावडरचा डबा आठ-एक इंच उंचीचा, कपभर गोलाईचा आहे. त्यातली पावडर जर मी एकटाच वापरत असेल तर तो डबा मला सात जन्म पुरेल. पण त्यासाठी मला पुन:पुन्हा जन्म घ्यायला हवा.
पुन्हा पुन्हा तीच मेव्हुणी आयुष्यात यायला हवी. त्यासाठी आज आहे तीच बायको सात जन्म लाभायला हवी. त्या दोघी बहिणी असायला हव्यात. लग्न झाल्यापासून दर वटपौर्णिमेला माझ्या बायकोने मला सात जन्मासाठी मागून घेतलं आहे. आता सात गुणिले सत्तावीस वर्षे म्हणजे एकशे एकोन्नवद जन्म माझी या चक्रातून सुटका नाही. तो पावडरचा डबा मला सात जन्म पुरेल हे नक्की. फक्त तो पावडरचा डबा पुढल्या पिढ्यांनी आमच्यापर्यंत पोहचवायला हवा.
– विजय शेंडगे





