Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवार यांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की,आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी बोललं आहे. आता हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडीओ किंवा फोटो आले आहेत ते आधी सरकारकडे आले होते की नव्हते? आता फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. अजून पुढे अनेक गोष्टी येतील. मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहेत का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. तर अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचे कारण सांगितले असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावं, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब
महाविकास आघाडीने त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. आता या नावाला मंजुरी द्यायची की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. भास्कर जाधव यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
जाधव यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषविली आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले जाधव एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.





