माझ्याशी कोणीही वाद घालू शकत नाही; आयात करांच्या मुद्यांवर ट्रम्प यांची भूमिका

वॉशिंग्टन : आयात शुल्काची आकारणी जशास तसे या तत्वावर करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेतून भारताला वगळले जाणार नाही, हे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पष्ट केले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश सहकारी एलॉन मस्क यांची दोन वृत्तवाहिन्यांनी संयुक्तपणे घेतलेली एक मुलाखत मंगळवारी संध्याकाळी प्रक्षेपित झाली. यामध्ये बोलताना ट्रम्प यांनी मोदींबरोबरच्या चर्चेचा दाखला दिला.
जशास तसे धोरणानुसार आयात शुल्काच्या मुद्यावर आपल्याशी कोणीही वाद घालू शकत नाही, याचा ट्रम्प यांनी यावेळी पुनरुच्चार केला. अमेरिकेवर जे आयात शुल्क लावले जाईल, तेच अमेरिकेकडूनही संबंधित देशावर लावले जाईल. भारताला यातून वगळले जाणार नाही, असे आपण पंतप्रधान मोदी यांना सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. आपले हे धोरण प्रत्येक देशासाठी लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या काही उत्पादनांवर मोठे आयात शुल्क लावले जाते. ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताकडून १०० टक्के आयात शुल्क लावले जाते. त्याच प्रमाणे अंमेरिकेकूनही आयात शुल्क लावले जाईल, असे मस्क यांनी सांगितले. जर मी २५ टक्के म्हणालो, तर हे खूप आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच आता मी जशास तसे धोरण अनुसरले आहे. या मुद्यावर माझ्याशी कोणीही वाद घालू शकणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत आयात शुल्काचा राजा असल्याचे त्यांनी संबोधले गेले होते.





