Chicken Pulao Recipe: बिर्याणी बनवण्याची कटकट नको! कुकरमध्ये फक्त ३ शिट्ट्यांत तयार करा चविष्ट चिकन पुलाव, रविवारच्या जेवणासाठी परफेक्ट रेसिपी
Chicken Pulao Recipe विशेष म्हणजे हा पुलाव कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. स्वयंपाकाची फारशी माहिती नसलेल्यांनाही ही रेसिपी सहज बनवता येईल. चला तर जाणून घेऊया चविष्ट चिकन पुलाव बनवण्याची सोपी कृती!

Chicken Pulao Recipe: रविवार म्हटलं की काहीतरी खास आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी चिकन बिर्याणी हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. मात्र, बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा वेळ, साहित्य आणि मेहनत पाहता अनेक जण ती घरी बनवण्याचे टाळतात. तुम्हालाही बिर्याणी खाण्याची इच्छा आहे, पण ती बनवण्याची कटकट नको असेल, तर चिकन पुलाव हा उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा पुलाव कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. स्वयंपाकाची फारशी माहिती नसलेल्यांनाही ही रेसिपी सहज बनवता येईल. चला तर जाणून घेऊया चविष्ट चिकन पुलाव बनवण्याची सोपी कृती!
चिकन पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य
– अर्धा किलो चिकन
– १ कप बासमती तांदूळ
– दीड कप पाणी
– १ मोठा कांदा
– १ मध्यम आकाराचा टोमॅटो
– १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट
– पाव कप दही
– ३ हिरव्या मिरच्या
– अर्धा चमचा हळद
– १ चमचा लाल तिखट
– १ चमचा गरम मसाला
– १ मोठा चमचा पुदिन्याची पाने
– १ मोठा चमचा कोथिंबीर
– १ मोठा चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या (ऐच्छिक)
– चवीनुसार मीठ
– ३ मोठे चमचे तेल किंवा तूप

Chicken Pulao Recipe
फोडणीसाठी साहित्य:
– ६ लवंगा
– ४ वेलची
– दालचिनीचा १ इंच तुकडा
– १ तमालपत्र
– १ चमचा शहाजिरे
चिकन पुलाव बनवण्याची सोपी कृती
स्टेप १ : चिकन आणि तांदूळ भिजवून घ्या
सर्वप्रथम अर्धा किलो चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात पाणी आणि थोडे मीठ घालून चिकन साधारण ३० मिनिटे भिजत ठेवा. दुसरीकडे एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण एक तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भात छान शिजण्यास मदत होते.
स्टेप २ : फोडणी तयार करा
आता गॅसवर प्रेशर कुकर ठेवा. त्यात तीन मोठे चमचे तेल किंवा तूप घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात लवंगा, वेलची, दालचिनी, तमालपत्र आणि शहाजिरे घाला. हे सर्व साहित्य थोडे परतून घ्या. त्यानंतर बारीक कापलेला कांदा घालून मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत परता. कांदा व्यवस्थित परतल्यामुळे पुलावाला छान चव येते.
स्टेप ३ : मसाला आणि चिकन परतून घ्या
कांदा परतल्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकून दोन मिनिटे परता. टोमॅटो मऊ झाल्यावर चिकनमधील पाणी काढून चिकन कुकरमध्ये घाला. मोठ्या आचेवर साधारण चार मिनिटे चिकन मसाल्यासोबत परतून घ्या. त्यानंतर दीड कप पाणी घाला. भिजवलेल्या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून तांदूळ कुकरमध्ये टाका.
स्टेप ४ : दही आणि सुगंधी साहित्य घाला
आता त्यात पाव कप गाळलेले दही, तीन हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला. सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा. तांदळाचे दाणे तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
स्टेप ५ : कुकरमध्ये शिजवून घ्या
आता कुकरचे झाकण लावून व्यवस्थित लॉक करा. मध्यम ते मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकरची वाफ जबरदस्तीने काढू नका. कुकर पूर्णपणे थंड होऊन दाब निघेपर्यंत झाकण उघडू नका. चिकन पूर्णपणे शिजले आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
स्टेप ६ : गरमागरम चिकन पुलाव सर्व्ह करा
कुकरमधील दाब पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडा. चमच्याच्या मदतीने पुलाव हलक्या हाताने खालून वरच्या बाजूला मिसळा. गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या नसतील, तर थोडे गुलाबजल शिंपडू शकता. झाला तुमचा चविष्ट आणि सुगंधी चिकन पुलाव तयार!
पुलावसोबत काय सर्व्ह कराल?
गरमागरम चिकन पुलावसोबत कांद्याची कोशिंबीर, काकडीचे रायते सर्व्ह करू शकता. यामुळे जेवणाची चव आणखी वाढेल. विशेष म्हणजे, कमी साहित्य आणि सोप्या कृतीमुळे बॅचलर्स, नवशिके कुक आणि व्यस्त गृहिणींसाठीही ही रेसिपी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे या रविवारी बिर्याणीऐवजी एकदा हा सोपा चिकन पुलाव नक्की बनवून पाहा!

