Moshi Accident : मोशीवर पुन्हा कचऱ्याचा भार नको – नगरसेवक वाघेरे
Moshi Accident : १६ एकर जागेचा प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी

पिंपरी – मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पालगतच्या सुमारे १६ एकर जागेत शहरातील दैनंदिन कचरा साठविण्याचा प्रस्ताव तात्काळ स्थगित करावा आणि पर्यावरणपूरक पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत कर्मचाऱ्यांचा मृत्यू व अनेकजण जखमी झाल्याने कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत त्याच परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर कचरा साठविणे पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरेल, असे वाघेरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रस्तावित जागेवर कचरा साठवल्यास लिचेटमुळे भूजल प्रदूषणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हायड्रोजियोलॉजिकल अभ्यास, भूजल गुणवत्तेचे परीक्षण आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून वस्तुनिष्ठ पाहणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोशी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून दुर्गंधी, वायू व भूजल प्रदूषण, डासांचा प्रादुर्भाव, वाहतूक कोंडी आणि आरोग्य समस्यांना सामोरे जात असल्याचे सांगत, पुन्हा त्याच भागावर शहराचा कचऱ्याचा भार टाकणे अन्यायकारक ठरेल, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
देहूरोड व पुनावळे येथील पर्यायी जागांचा वैज्ञानिक निकषांवर विचार करून विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, तसेच मोशी डेपोतील बायोमायनिंग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि पर्यावरणीय बाबींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





