Actor Rajpal Yadav: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदवीर राजपाल यादवने गुरुवारी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण (सरेंडर) केले आहे. ५ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालचा वाढीव वेळेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अखेर तुरुंगाची वाट धरावी लागली. “माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी मित्रही नाही, या संकटाचा सामना मला एकट्यालाच करावा लागेल,” अशी हतबलता राजपालने शरण येण्यापूर्वी व्यक्त केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? हे प्रकरण २०१० मधील एका कर्जाशी संबंधित आहे. राजपाल यादवने आपला दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘अता पता लापता’ (२०१२) हा चित्रपट बनवण्यासाठी दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित होऊनही त्याने कर्जाची परतफेड केली नाही. याप्रकरणी २०१८ मध्ये राजपाल आणि त्याची पत्नी राधा यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान राजपालला १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. ‘कायद्यासमोर सर्व समान’; न्यायालयाने फटकारले – राजपाल यादवला ४ फेब्रुवारीपर्यंत शरण येण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्याने मुदतवाढ मागितली होती. गुरुवारी सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती विशिष्ट क्षेत्रातील किंवा ग्लॅमर उद्योगातील आहे म्हणून तिला विशेष वागणूक दिली जाऊ शकत नाही. “कायद्यासमोर सर्व समान आहेत,” असे नमूद करत खंडपीठाने त्याला तात्काळ तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास राजपाल तिहार तुरुंगात हजर झाला. “इथे सगळे एकटेच असतात” – शरण येण्यापूर्वी एका मुलाखतीत राजपाल म्हणाला, “सर, मी काय करू? माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणताही उपाय दिसत नाही. इथे आपण सगळे एकटेच आहोत, कोणीही मित्र नाही. मला या संकटातून स्वतःच बाहेर पडावे लागेल.” प्रियदर्शन सारख्या जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मागितली का? या प्रश्नावर त्याने अत्यंत निराश उत्तर दिले. सोनू सूदकडून मदतीचे आवाहन – राजपाल यादवच्या या कठीण काळात अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीला धावून आला आहे. सोनूने ‘X’ (ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट लिहित संपूर्ण चित्रपट उद्योगाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सोनूने म्हटले की, “राजपाल एक उत्तम कलाकार आहे. हा काळ त्याच्यासाठी कठीण आहे. मी त्याला माझ्या चित्रपटात घेणार आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्याला कामासाठी आगाऊ रक्कम (साइनिंग अमाऊंट) देऊन मदत करावी, जेणेकरून त्याचा सन्मानही राखला जाईल. आपण एक कुटुंब आहोत हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे.” राजपालचा फिल्मी प्रवास – दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणाऱ्या राजपाल यादवने ‘जंगल’ (२०००) मधील नकारात्मक भूमिकेतून ओळख मिळवली होती. त्यानंतर ‘भूल भुलैया’, ‘हंगामा’ आणि ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांमधून तो घराघरात पोहोचला. अलीकडेच तो ‘बेबी जॉन’ (२०२४) आणि ‘इंटर्रोगेशन’ (२०२५) मध्ये दिसला होता. अक्षय कुमारसोबतचा त्याचा आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे, तर ‘वेलकम टू द जंगल’चे चित्रीकरणही त्याने पूर्ण केले आहे.