Pune | शासकीय कार्यालयात विना हेल्मेट

पुणे, – शासकीय कार्यालयात विना हेल्मेट आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईला सुरूवात केली आहे. यानुसार १६८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी पुण्यात आरटीओ, पोलीस, जिल्हा प्रशासन यांची काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली. पुण्यात हेल्मेटचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्यांनी या बैठकीत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी तरी सुरुवातीला हेल्मेटचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. त्याबाबतचे आदेश विभागीय जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना काढले. त्यानुसार आता आरटीओकडून शासकीय कार्यालयात विना हेल्मेट येणाऱ्यावर कारवाईला सुरूवात केली आहे.
सरकारी कर्मचारी व आरटीओचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्यामुळे ही कारवाई संथगतीने होती. आता निवडणुकांची गडबड संपली. त्यामुळे कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. दि. २० ऑक्टोबरपासून केलेली हेल्मेट तपासणीत ६८० वाहनांची तपासणी करून १६८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांबरोबर खासगी व्यक्तींनादेखील हेल्मेट वापरने बंधनकारक आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर सर्व सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घातल्यास कारवाईला सुरूवात केली आहे. आरटीओची पथके कार्यालयासमोर ही कारवाई करीत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही कारवाई वाढविण्यात येणार आहे.
– अर्चना गायकवाड – प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे




