ICC Annual Conference 2024 : श्रीलंकेत आयसीसीची वार्षिक परिषद संपन्न, भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर चर्चाच नाही…

ICC Annual Conference (कोलंबो) – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेत वार्षिक परिषद आयोजित केली होती. या चार दिवसीय परिषदेत 108 आयसीसी सदस्य सहभागी झाले होते. आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याशी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्याबाबत चर्चा करतील अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत दोन्ही मंडळांमध्ये कोणतीही चर्चाच झाली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे, त्यासाठी 6 संघांनी पाकिस्तानला जाण्याचे मान्य केले आहे, मात्र भारतीय संघाच्या जाण्याबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये होऊ शकते. आयसीसीच्या बैठकीत या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. यामध्ये फक्त चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे बजेट पास करण्यात आले.
आयसीसीच्या बैठकीत अमेरिकन क्रिकेट बोर्ड आणि चिली क्रिकेट या दोघांना आयसीसी सदस्यत्वाच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कालावधीत, दोन्ही क्रिकेट बोर्डांना 12 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे, ज्यामध्ये ते सुधारणा करू शकतात.
टी-२० विश्वकरंडकातील तोट्यासाठी समिती
माध्यमांनुसार, गेल्या महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी-20 विश्वकरंडकाचे आयोजन आयसीसीसाठी तोट्याचा सौदा ठरला आहे. स्पर्धेदरम्यान बजेटपेक्षा जास्त पैसा तिथे खर्च झाला. अशा स्थितीत आयसीसीच्या बैठकीत याबाबत तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात रॉजर टूसे, लॉसन नायडू आणि इम्रान ख्वाजा यांचा समावेश आहे. ही समिती वर्षअखेरीस विश्वकरंडकाबाबत आपला अहवाल सादर करेल.
Women’s Asia Cup 2024 (Semi Final 1) : बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित – शेफाली वर्मा
महिला टी-20 विश्वकरंडकात संघांची संख्या वाढणार
या बैठकीत महिला टी-20 विश्वकरंडकात संघांची संख्या वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली. 2030 च्या आवृत्तीपासून या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. पुढील विश्वकरंडक स्पर्धेत 10 संघ सहभागी होतील आणि 2026 च्या आवृत्तीत 12 संघ खेळतील. यासाठी 31 ऑक्टोबर 2024 ही पात्र ठरण्याची शेवटची तारीख असेल. आयसीसीने 2026 मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकासाठी 8 प्रादेशिक पात्रता स्थळांची घोषणा केली. यामध्ये आफ्रिका आणि युरोपमधील प्रत्येकी 2 संघ, अमेरिका खंडातील 1 संघ आणि आशिया आणि ईएपी (पूर्व-आशिया पॅसिफिक) विभागीय पात्रता विभागातील एकूण 3 संघ पात्र ठरतील.





