Asaram Bapu News : आसारामला जामीन नाहीच..! आसाराम बापूला न्यायालयाचा मोठा झटका
आसारामला २५ एप्रिल २०१८ रोजी त्याच्या आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Asaram Bapu News – २०१३ मधील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ‘स्वयंभू धर्मगुरू’ आसाराम याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने आसारामची दोषी ठरवण्याची कारवाई आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवल्याने त्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने तूर्तास आसारामला जामीन देण्यास नकार दिला. राज्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर, केवळ त्याच्या जीवाला धोका असेल अशा अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतच जामिनाचा विचार केला जाईल, असे खंडपीठाने तोंडी स्पष्ट केले.
राजस्थान उच्च न्यायालयाने २७ मे रोजी आसारामला दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. मात्र, आयपीसी आणि पोक्सो कायद्यांतर्गत सामूहिक बलात्कार आणि बालकावरील गंभीर लैंगिक अत्याचार हे आरोप फेटाळले होते.
आसारामला २५ एप्रिल २०१८ रोजी त्याच्या आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या तो जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.






