“माझ्या वडिलांना पुन्हा मुख्यमंत्री करा ….” ; नितीश कुमार यांच्या मुलाकडून पहिल्यांदाच जनतेला आवाहन

Nitish Kumar son । बिहारमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच जनतेसमोर आले आहेत. निशांत कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत जेडीयूला विजयी करण्याचे आवाहन लोकांना केले. निशांतने त्यांचे वडील नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे जनतेला आवाहनही केले आहे.
नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष आहेत. २०२४ मध्ये नितीश यांनी नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी एनडीए जेडीयूच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. नितीश हे २० वर्षांपासून बिहारमध्ये सत्तेत आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांचे पुत्र निशांत हे आतापर्यंत राजकारणापासून अंतर राखून होते. पण, पहिल्यांदाच त्यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात नितीश यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे.
बख्तियारपूरमध्ये निशांत-नितीश एकत्र Nitish Kumar son ।
निशांत कुमार हे वडील नितीश कुमार यांच्यासोबत बख्तियारपूर याठिकाणी त्याच्या वडिलोपार्जित घरी गेले होते. याठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. कविराज राम लखन सिंह यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दोघांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘नितीश यांचे सरकार पुन्हा आणा…’ Nitish Kumar son ।
यावेळी निशांत कुमार यांनी आपल्या वडिलांसाठी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते यावेळी म्हणाले,”या वर्षी मी पहिल्यांदाच माध्यमांना भेटलो. मी बिहारच्या लोकांना आणि देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.” असे ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”नवीन वर्षात निवडणुका आहेत, त्यामुळे शक्य असल्यास जनतेने माझ्या वडिलांना आणि त्यांच्या पक्षाला मतदान करावे आणि त्यांना पुन्हा सत्तेत आणावे. नेहमीप्रमाणे ते यावेळी देखील चांगले काम करतील असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
जेव्हा माध्यमांनी त्यांना राजकारणात येण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा निशांत यांनी,”मी याठिकाणी फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच निशांतने स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या आजोबांच्या योगदानाचाही उल्लेख केला. निशांत म्हणाला, माझे आजोबा देखील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्यात ते तुरुंगातही गेले. याच कारणास्तव, वडिलांनी (मुख्यमंत्री नितीश कुमार) त्यांना राज्य सन्मानाचा दर्जा दिला आहे. आजोबांसह आणखी चार सैनिकांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.” असेही त्यांनी म्हटले.
बिहारमध्ये यावर्षी निवडणुका होणार आहेत. एनडीए विरोधी महाआघाडीशी स्पर्धा करत आहे. एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा, चिराग पासवान यांचा लोजपा (आर) आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष यांचा समावेश आहे. तर महाआघाडीत लालू प्रसाद यादव यांचा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीचा समावेश आहे.





