नितीश कुमार यांना भारतरत्नने सन्मानित करावे; पाटण्यात झळकले पोस्टर्स

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे. त्या मागणीचे पोस्टर्स नितीश यांच्या पक्षाने (जेडीयू) बिहारची राजधानी पाटण्यात विविध ठिकाणी झळकावले आहेत. नितीश यांच्या विषयीचे अचानकपणे झळकलेले पोस्टर्स चर्चेचा विषय बनले आहेत. त्यावर जेडीयूमधील सुत्रांनी प्रतिक्रिया दिली.
ती मागणी म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नाही. स्वत: नितीश यांना ती रूचणार नाही. मात्र, सर्वोच्च सन्मानासाठी नितीश पात्र असल्याचे पक्षातील सर्वांना वाटते, असे त्या सुत्रांनी म्हटले. बिहारचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळासाठी भुषवण्याचा मान नितीश यांच्या नावावर जमा झाला आहे. ते २००५ यावर्षापासून काही महिन्यांचा अवधी वगळता मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सांभाळत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नितीश केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी त्यांनी कृषी आणि रेल्वे मंत्रालये सांभाळली.
दरम्यान, नितीश यांच्या विषयीच्या मागणीची लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदने खिल्ली उडवली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यासाठी भाजपने नितीश यांच्यावर दबाव टाकला आहे. त्यामुळे जेडीयूमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून नितीश यांचे महत्व वाढवण्याची उठाठेव त्यांच्या विषयीच्या मागणीच्या माध्यमातून केली जात आहे, अशी प्रतिक्रिया राजदने दिली.





