Nitish Kumar : नितीश नाराज की बदलली स्टाईल? प्रसिद्धी टाळून तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूच्या तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू केली. प्रसिद्धी टाळून त्यांनी काही उमेदवारांना तिकीट दिले. त्यामुळे नितीश यांनी स्टाईल बदलली की ते नाराज आहेत, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या चर्चांना पेव फुटले आहे. बिहारमध्ये जेडीयू, भाजपसह ५ पक्षांचा समावेश असणाऱ्या आघाडीची (एनडीए) सत्ता आहे.
एनडीएने नुकतेच जागावाटप जाहीर केले. त्यानुसार, जेडीयू आणि भाजप प्रत्येकी १०१ जागा लढवतील. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. मागील निवडणुकीपर्यंत (वर्ष २०२०) जेडीयू एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. तो पक्ष भाजपपेक्षा अधिक जागा लढवायचा. मात्र, यावेळी दोन्ही पक्ष प्रथमच समसमान जागा लढवणार आहेत. जागावाटपात मोठा वाटा न मिळाल्याने नितीश अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अशात त्यांनी गाजावाजा टाळून तिकीट वाटप सुरू केल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत. साधारणपणे पत्रकार परिषदेत उमेदवार जाहीर करण्याचा मार्ग जेडीयूकडून अवलंबला जातो.
नितीश यांनी तिकीट वाटपाची नवी पद्धत अवलंबल्याने एनडीएच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याचा दावा करण्याची संधी विरोधकांना मिळाली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय दुबे यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. उमेदवार जाहीर करण्यासाठी एनडीएची संयुक्त पत्रकार परिषद होणार होती. मात्र, ती झाली नाही. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर, नितीश पत्रकारांना आणि स्वपक्षाच्या नेत्यांनाही भेटत नसल्याचे समजते. ते जाहीरपणे काही बोलत का नाहीत? त्यातून एनडीएमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे वाटते, असे त्यांनी म्हटले.





