..अन् नितीश कुमार उदघाटन करताना स्टेजवरून कोसळले Video

नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कायम चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय विधानांची कायमच दखल घेतली जाते. मात्र आज ते राजकीय वक्तव्यावरून नाही तर अन्य भलत्याच कारणावरून चर्चेत आले आहेत. बरे ज्या घटनेमुळे त्यांची चर्चा होते आहे त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र नितीश यांनी किंचित हास्य करत या विषयावर चर्चा करणे किंवा त्याला अवास्तव महत्व देण्याचे टाळले.
त्याचे झाले असे की काल 5 सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नितीश कुमार पाटणा विद्यापीठात पोहोचले होते. तेथे त्यांच्या हस्ते दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नामशिलेचे अनावरण केले जाणार होते. ते करण्यासाठी नितीश मंचाच्या पायऱ्यांवर चढले आणि अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. ते पूर्ण खाली कोसळण्याच्या आतच तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले आणि नितीश यांनी नंतर नामशिलेचे अनावरण केले.
काही क्षणांत झालेल्या या प्रकारामुळे सगळेच धास्तावले. मात्र नितीश यांनी किंचित हास्य करत हा विषय तेथेच संपवला. तथापि, नितीश यांच्या संदर्भात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ मात्र अगोदरच तयार झाला होता आणि तो व्हायरलही झाला.
पटना विश्वविद्यालय के व्हीलर सीनेट हाउस का लोकार्पण करने के दौरान गिरे CM नीतीश कुमार. pic.twitter.com/ZF8vQYhr6y
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) September 5, 2023
दरम्यान, शिक्षक दिनाचे औचित्य साधत कालच बिहारमधील तब्बल 75 हजार शिक्षकांनी बिहार सरकारचा निषेध केला. त्यांनी काळ्या पट्ट्या बांधूनच कालच्या कामकाजात सहभाग घेतला होता. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपणे आणि अन्य सरकारी कामांसाठी त्यांना पाचारण करणे याला शिक्षकांचा विरोध असून हे तात्काळ थांबवले जावे अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्याकरताच काल या 15 संघटनांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. दरम्यान, येत्या 9 तारखेला बिहारमध्ये मोठे आंदोलन केले जाणार असून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याचे शिक्षक संघटनांनी जाहीर केले आहे.





