नितीन गडकरी दूर करणार वसुंधरा राजेंची नाराजी

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – भाजप हायकमांडवर नाराज माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राजस्थानच्या मोहिमेवर पाठविले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे भाजप हायकमांडची झोप उडाली आहे. अशात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राजे यांची समजूत काढण्यासाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती आहे.
पुढच्या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. अलिकडेच यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरची सत्ता मिळाली होती. याशिवाय, राज्यसभेचा निकालामुळे भाजपच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारले आहे.
अशात, वसुंधरा राजे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे भाजपच्या उत्साहावर विजरण पडले आहे. निवडणुकीच्या मुद्यावर मंथन करण्यासाठी कोटा येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. महासचिव आणि राज्याचे प्रभारी अरूण सिंग यांच्यासह तमाम बडे नेते बैठकीत उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात राजे यांनी संबोधित करायचे होते. परंतु, वसुंधरा राजे मधातच बैठकीतून निघून गेल्या. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
राजस्थानमध्ये भाजप दोन गटात विभागली गेली आहे. वसुंधरा राजे आणि भाजप हायकमांड यांच्यातील छत्तीसचा आकडाही कुणापासून लपून नाही. मुळात, राजस्थानमध्ये कुणाचाही चेहरा पुढे न करता निवडणुकीला सामारे जायचे अशी हायकमांडची इच्छा आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जयपूरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून सामुहिक नेतृत्वाच्या मुद्यावर एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता. याउलट, वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी, अशी राजे गटाची मागणी आहे. याच कारणामुळे राजे नाराज आहेत.
ही गटबाजी लवकरात लवकर नाही थांबली तर विधानसभेच्या निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, अशी भीती भाजपला आहे. यामुळे दिल्लीतून मोठ्या नेत्याला राजस्थानमध्ये पाठविले जात आहे. बहुधा ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपविली जावू शकते. गडकरी आणि राजे यांचे संबध चांगले आहेत. शिवय, यापूर्वी गडकरी यांनीच राजे यांची समजूत काढून वाद संपुष्टात आणला होता.





