Nitin Deshmukh :”देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात…”; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराची फडणवीसांवर टीका

Nitin Deshmukh : अकोला जिल्ह्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हापरिषद सदस्याला अपात्र करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठवला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात, अशी टीकाही नितीश देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केली आहे.
जिल्हापरिषद सदस्य अपात्रता प्रकरणावरून संतप्त झालेल्या नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) फडतूस संबोधतात. देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात. त्याप्रमाणं अकोला जिल्ह्यातही फडणवीस फडतूस राजकारण करत आहेत. हे उदाहरण गोपाल दातकर यांचा प्रस्ताव पाठवून सिद्ध झालं.”असा आरोप त्यांनी केला आहे.
“पालकमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जिल्ह्यात फिरकले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत. शेतकऱ्याला २५ टक्के विमा देण्याचे जाहीर केले आहे. अद्यापही शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही अथवा त्याबाबत बैठक घेतली. कधी जिल्हा नियोजन मंडळाची बैठकही घेतली नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अपात्र करण्याचं फडतूस राजकारण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत,” असा आरोप नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याबाबत गावातील एका व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवर तहसीलदारांनी पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. नंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेवून विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची प्रस्ताव पाठविला. २१ जुलैला पाठविलेला प्रस्ताव आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव नियमबाह्य असल्याचं सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठविला. पण, २५ जुलैला विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला.





