Nithari Kand : निठारी हत्याकांड प्रकरणी मोठा निर्णय: सुरेंद्र कोलीसह मनिंदरसिंग पंढेर सर्व खटल्यातून निर्दोष, फाशीची शिक्षाही रद्द

Nithari Kand : नोएडातील प्रसिद्ध निठारी हत्याकांड (Nithari Kand) प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सुरेंद्र कोली आणि मनिंदर सिंग पंढेर यांची दोषी ठरलेल्या सर्व खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोली याला १२ प्रकरणांमध्ये आणि मनिंदरसिंग पंढेरला दोन प्रकरणांमध्ये सुनावलेली फाशीची शिक्षादेखील रद्द केली.
उच्च न्यायालयाने गाझियाबादच्या सीबीआय न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द केली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोन्ही दोषींच्या १४ अर्जांवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. सुरेंद्र कोली यांनी 12 प्रकरणांमध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते. तर मनिंदरसिंग पंढेर यांनी दोन प्रकरणांमध्ये दिलेल्या शिक्षेविरोधात अर्ज दाखल केला होता.
उच्च न्यायालयाने अर्जांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने 15 सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एसएचए रिझवी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. निठारी हत्याकांड (Nithari Kand) 2006 मध्ये उघड झाला होता.
हायकोर्टात 134 कामकाजाच्या दिवसांत या अपिलावर सुनावणी झाली. सुरेंद्र कोली यांच्या विद्यमान बारा याचिकांपैकी पहिली याचिका २०१० मध्ये दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकांव्यतिरिक्त कोलीच्या काही याचिकाही उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. एका प्रकरणात फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे तर दुसऱ्या प्रकरणात विलंबाच्या आधारे जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आले आहे.
या आधारावर निर्दोष मुक्त
कोणताही प्रत्यक्ष पुरावा आणि साक्षीदार नसल्याने उच्च न्यायालयाने दोषींची निर्दोष मुक्तता केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. मात्र, रिम्पा हलदर खून प्रकरणात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुरेंद्र कोलीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या पुराव्याच्या आधारे या दोघांना रिम्पा हलदर खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.





