शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते, खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांना पुढील दोन महिने ब्रेक मिळाला आहे. काही दिवस राऊत राजकारणापासून दूर राहणार असून, ‘राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नसावेत’ ही उक्ती आज पुन्हा खरी ठरली. नेहमी एकमेकांवर कठोर टीका करणारे संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील मैत्रीपूर्ण भावना समोर आली आहे. .@rautsanjay61 जी.. काळजी घ्या लवकर बरे व्हा! — Nitesh Rane (@NiteshNRane) November 1, 2025 संजय राऊतजी… काळजी घ्या – नितेश राणे संजय राऊत नेहमी राणे कुटुंबीयांवर आरोप करताना दिसतात, तर नितेश राणे यांनीही राऊतांवर अनेकदा तिखट शब्दांत टीका केली आहे. मात्र, राऊतांच्या प्रकृतीची बातमी कळताच नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. “संजय राऊतजी… काळजी घ्या. लवकर बरे व्हा!” असे पाच शब्दांचे ट्विट राणे यांनी केले, जे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी शिकवण ठरले आहे. पंतप्रधान मोदींनीदेखील केले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊतांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. “संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो,” असे मोदींनी म्हटले आहे. राऊत-राणे यांच्यातील वाद दरम्यान, २०२३ मध्ये संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायालयाने गुरुवारी भाजप नेते नितेश राणे यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्यास नकार दिला. त्याचवेळी राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. त्या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आक्रमक टीका केली होती.राऊतांच्या तब्येतीमुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत असली तरी, विरोधकांच्या शुभेच्छांनी मानवीय बाजू उजागर केली आहे.