‘अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे’; नितेश राणेंची सडकून टीका

Nitesh Rane on Abu Azmi | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाशी संबंधित वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी औरंगजेबचे कौतुक करत त्याने मंदिरं बांधली होती असा दावा केला होता. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री नितेश राणे यांनी देखील सडकून टीका करत आझमींना ‘औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे’, असे म्हटले आहे.
‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवली आहेत. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे.’ असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. यावरून आता इतर नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
मंत्री नितेश राणे यांनी आझमींवर शाब्दिक हल्ला चढवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अबू आझमीसारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे. एवढं प्रेम औरंग्याबद्दल आहे तर त्यांना त्याच्या बाजूला झोपवलं पाहिजे, अशा शब्दात राणे यांनी सडकून टीका केली.
अबू आझमींच्या या वक्तव्याचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पडसाद पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घालत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आझमींवर टीका केली आहे. ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अतिशय दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. औरंगजेबाचे कौतूक म्हणजे महापाप आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे’ असे म्हणत शिंदेंनी आझमींवर निशाणा साधला.





