चिंताजनक! केरळात तीन वर्षांनी निपाहचा पुन्हा संसर्ग; 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

कोझीकोडे – केरळमधील कोझीकोडे येथील एका 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणूच्या संसर्गाने रविवारी सकाळी मृत्यू झाला. या राज्यात वटवाघळांपासून पसरणाऱ्या या विषाणूंनी 17 जणांचे प्राण घेऊन तीन वर्ष उलटल्यानंतर पुन्हा एका त्याचा संसर्गित सापडला आहे.
या युवकाच्या रक्त, मज्जारज्जूजवळील द्रव पदार्थ आणि प्लाझ्मा यांची तपासणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
त्याच्या चाचण्यांचे निकाल शनिवारी हाती आल्यानंतर कृती आराखडा निश्चित करण्यात आला. या मुलाचा मृत्यू रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. त्याच्या निकटच्या संपर्कात आलेल्या अन्य कोणालाही कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पत्र सुचना कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, एनसिफिलायटीस आणि म्याओकॅर्डीटीसची क्षण आढळलेला हा 12 वर्षाचा मुल कोझीकोडे जिल्ह्यात तीन सप्टेंबरला रुग्णालयात हजर झाला. केंद्र सरकारने आरोग्य खात्यातील वरीष्ठांचे पथक तातडीने केरळला पाठवले आहे. ते पथक राज्य सरकारला तांत्रिक मदत पुरवेल.
या भागातील आणि विशेषत: मल्लपुरम येथील कुटुंबीय, गावातील नागरीकांमध्ये असणाऱ्या संभाव्य सक्रिय बाधितांचा शोध गेल्या बारा दिवसांपासून सुरू आहे. संपर्कात आलेल्यांचे आणि संशयितांचे सक्तीने अलगीकरण आणि विलगीकरण केले जात आहे. त्यांच्या नमुने गोळा करून ते तपासणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आपत्कालीन बैठक
मुलाच्या संसर्गाची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन बैठक घेतली. त्यास ए. के. ससीद्रम, अहमद देवरकोविल आणि महंमद रियास हे मंत्री उपस्थित होते. निपाह विषाणूचा संसर्ग दक्षिण भारतात कोझिकोडे येथे 19 मे 2018 ला झाला होता. त्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.





