पुणे | दिवसभरात नऊ अनधिकृत होर्डिंग पाडले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबईत होर्डिंग (जाहिरात फलक) कोसळल्यामुळे १६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील धोकादायक होर्डिंग काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सरसावल्या असून, महापालिकेकडूनही आयुक्तांच्या आदेशानुसार दिवसभरात ९ जाहिरात फलक जमीनदोस्त केले आहेत.
त्यात कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ५, तर वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीताल ३ आणि वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका जाहिरात फलकाचा समावेश आहे.
यातील काही फलक नियमबाह्य, तर काही फलक परवानगीपेक्षा मोठे असल्याने महापालिकेकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याशिवाय आणखी ७२ जाहिरात फलकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, शहरात ७ ठिकाणी उभारण्यात आलेले बांबूचे पहाडही जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिका आयुक्तांनी मुंबईच्या दुर्घटनेनंतर बैठक घेत शहरातील धोकादायक जाहिरात फलकांची तपासणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळांना दिले आहेत. याशिवाय आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बुधवारी जंगली महाराज ते अलका चौकदरम्यान लावलेल्या जाहिरात फलकांची पाहणी केली होती.
त्या वेळी अनेक फलक धोकादायक पद्धतीने लावण्यात आल्याचे उघड झाले. या होर्डिंगच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्याअंतर्गत महापालिका प्रशासनाने अलका चौक आणि खंडोजीबाबा चौकातील स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या फलकांनाही नोटीस बजावली आली आहे.
जुन्या इमारतीवर ७ होर्डिंगचा भार
खंडोजीबाबा चौकात एक ६० वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीवर एकूण ७ होर्डिंग आहेत. इमारत जुनी असल्याने त्या होर्डिंगचा भार सहन न झाल्यास या चौकात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील मोठ्या चौकांपैकी एक असलेला हा चौक असल्याने महापालिकेकडून येथेही तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.





