अंत्री बुद्रुक येथे विषबाधेमुळे नऊ गायींचा मृत्यू

शिराळा – अंत्री बुद्रुक (ता. शिराळा जि. सांगली) येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोठ्यामधील एकूण 17 गायींपैकी 9 गायींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. आज सकाळी या १७ पैकी ९ गायींना हे पशुखाद्य देण्यात आले. बाकीच्या 8 गायी गाभण असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते. त्या गायी सुरक्षित आहेत. परंतु 9 गायी पशुखाद्य दिल्यानंतर अवघ्या पंधरा- वीस मिनिटांत पोट फुगून मृत्यूमुखी पडल्या.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याला काही समजले नाही. गावामध्ये समजेल तशी लोकांनी गोठ्यावर गर्दी केली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक व विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी भेट दिली. शिवाजीराव नाईक यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व पोलीस ठाणे व वारणा कारखान्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांना फोन वरून घटनेची माहिती दिली. शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा या पद्धतीने पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती शिराळा सतीश कुमार जाधव, विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, वारणा दूध संघाचे वर्धा अधिकारी एस. एन. खोत डॉ. कैलास पोकळे, डॉ. दीपक पाटील यांनी तात्काळ भेट दिली. तर सुनील पाटील, प्रताप चव्हाण, के. डी. पाटील, उपसरपंच राजेश चव्हाण, सरपंच सुजाता पाटील, उत्तम पाटील, प्रकाश पाटील, सुधीर कुंभार, जालिंदर मोरे,महादेव चव्हाण, विश्वास मोरे आनंदा मोरे, शहाजी मोरे, शिवाजी चव्हाण व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





