Nilesh Nikam : महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ॲड. निलेश निकम यांच्याकडे सोपविली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी निकम यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र दिले. महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागा जिंकून महापौरपद ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सोमवारी महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली. भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आघाडीचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या २७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा स्वाभाविक होता. अजित पवार यांनी यापूर्वीच ॲड. निलेश निकम यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली होती. सोमवारी सायंकाळी महापौरांनी निकम यांना विरोधी पक्ष नेतेपदाचे पत्र दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोपान ऊर्फ काका चव्हाण तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन गावडे यांनाही त्यांच्या-त्यांच्या गटनेतेपदाची पत्रे देण्यात आली. ॲड. निलेश निकम हे आतापर्यंत पाच वेळा महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले असून, प्रशासकीय, सभागृह कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. अग्रलेख : केरळ पॅटर्न