Nilesh Lanke and Rohit Pawar on Gopichand Padalkar : सांगलीच्या राजकीय मैदानात वादळी हंगाम सुरू झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याने पेटलेल्या वादाचे पडसाद आज ‘संस्कृती बचाव मोर्चा’च्या सभेत दणक्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी सभेत पडळकरांवर आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. निलेश लंकेंनी तर थेट ‘पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात ये’ असं आव्हान दिलं, तर रोहित पवारांनी पडळकरांना ‘बेन्टेक्सचं सोनं’ म्हणत फडणवीस सरकारच्या ‘गलिच्छ राजकारणावर’ टीका केली. ‘दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या’; निलेश लंकेंचं थेट आव्हान सभेत बोलताना खासदार निलेश लंके यांनी पडळकरांवर वैयक्तिक हल्ला चढवला. “याचा आका एसीत बसतो, आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात ये”, असं म्हणत त्यांनी पडळकरांना थेट मैदानात लढण्याचं आव्हान दिलं. लंके म्हणाले, “वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते, आता चार घेऊन फिरत आहेत. दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या”. ‘पडळकर म्हणजे बेन्टेक्सचं सोनं : रोहित पवार आमदार रोहित पवार यांनीही पडळकरांवर कडाडून हल्ला केला. “गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचं सोनं आहे.” असं म्हणत त्यांनी पडळकरांच्या वक्तव्यांना चातुर्याने उत्तर दिलं. पवार म्हणाले, “हा विषय तालुका किंवा जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो, पण शब्दांची पातळी जपतो. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी निनावी जाहिराती दिल्या.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट टीका केली: “गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात फडणवीस यांनी आणलं आहे.” पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला. आपण त्यांची जयंती साजरी करतो पण अनुकरण करत नाही. बहुजन समाजाच्या नेत्याचा वापर पवार कुटुंबावर, मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी केला जातोय. पाटील कुटुंबाला बोलतात, बहुजन समाजाच्या नेत्यांना कळत नाही की यांचा उपयोग करून घेतला जात आहे. या लोकांना बोलून उपयोग नाही, यांचा बोलवता धनी कोण? त्यांना बोलले पाहिजे. आमच्यावर ईडीची नाहीतर दुसरी कोणतीही कारवाई करा, आम्ही घाबरणार नाही. निवडणूक आली की हे लोक समाजासमाजात तेढ निर्माण करतात. लोकसभेत हिंदू-मुस्लिम केलं, विधानसभेत मराठा-ओबीसी केलं, आता मुंबईत मराठी-अमराठी करत आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. पडळकरांच्या वक्तव्याने पेटलं राजकारण हा वाद भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या १८ सप्टेंबरला जत येथील सभेतील वक्तव्यांमुळे सुरू झाला. जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणींमुळे राष्ट्रवादी नेत्यांतून संतापाची लाट उसळली. शरद पवार यांनीही १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलून नाराजी व्यक्त केली. फडणवीसांनी पडळकरांना ‘तरुण आणि आक्रमक’ म्हणत सावध केलं, पण वाद थांबला नाही. आता लंकेंचं आव्हान आणि पवारांचा हल्लाबोल यामुळे सांगलीतील राजकारण आणखी तापलंय.